पोलिस कर्मचाऱ्यांना मटका व्यावसायिकांशी सलगी ठेवणं पडले महागात; पोलीस अधीक्षकांनी केली दोघांवर कारवाई
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. पोलीस खात्यामध्ये छुप्या मार्गाने अवैध मटका व्यावसायिकांशी सलगी वाढवून "सट्टामटका" खेळणाऱ्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गय न करता दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने पोलीस खात्यात पुरती खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू राहिल्यास व खात्यातील कर्मचारी खेळत असल्यास संबंधित हद्दीच्या प्रभारी निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
पोलीस दलात सट्टा मटका खेळत असल्याच्या वायरल झालेल्या घटनेच्या चित्रफीत (विडिओ) मुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला कलंक लागत आहे. वणी पोलिस स्टेशन च्या परिक्षेत्रात मटका, जुगार, दारू आदी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता अवैध धंदेवाल्यासोबत पोलिसांची सलगी असल्याचे या कार्यवाहीने उघड झाले आहे.
पोलीस खात्यामध्ये पोलीस कर्मचारी अवैध व्यावसायिकांशी संबंध ठेऊन मटका खेळत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर वायरल झाला होता, ह्यामुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पोलखोल झाली असून पंकज उंबरकर व विशाल गेडाम अशी या निलंबनाची कार्यवाही झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस खात्याची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली.
पोलिस कर्मचाऱ्यांना मटका व्यावसायिकांशी सलगी ठेवणं पडले महागात; पोलीस अधीक्षकांनी केली दोघांवर कारवाई
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2024
Rating: