सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील भोगवटा वर्ग २ ची वर्ग १ मध्ये वर्गीकरण* करण्यासाठीची प्रलंबित व नव्याने दाखल केलेली प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढावी असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले.
वरोरा, भद्रावती या दोन्ही तालुक्यामध्ये भो. वर्ग २ मधून भो. वर्ग १ मध्ये परिवर्तीत करण्यासाठी मागासवर्गीय व अन्य प्रवर्गातील शेकडो शेतकरी बांधवांची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तकारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल झाल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता मागासवर्ग आयोगाने दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी वरोरा येथील कटारिया सभागृहात महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वाटप, सिलींग,भूदान, कुळ, औद्योगीक, न.प. क्षेत्र व अन्य जमिनीचे भोगवटा २ ते १ करण्याच्या मागणी अर्जावर ही सुनावणी घेतली.
मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जनसुनावणीला आयोगाचे सल्लागार व अन्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी कुंभार, वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्रा, वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर व महसुल विभागाचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी इंजि. रमेश राजुरकर, करण देवतळे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, तुळशीराम श्रीरामे, विजय वानखेडे, ओम मांडवकर, राजु घरोटे, अंकुश आगलावे, नरेंन्द्र जिवतोडे, राजु गायकवाड, धनंजय पिंपळशेंडे, राजु गायकवाड, रोहिणीताई देवतळे, अॅड. सुनिल नामोजवार, प्रशांत डाखरे, अर्चना जिवतोडे, वसंता बावणे, पवन एकरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.
या जनसुनावणीमध्ये मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी भोगवटा वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याकरिता मालमत्तेच्या ५० टक्के रक्कमेचा भरणा करण्याचा नियम असल्याने ही रक्कम कमी व्हावी याकरिता आयोगाच्या माध्यमातून राज्यशासनाकडे शिफारस केली जाईल असे, उपस्थित शेतकरी बांधवांना आश्वासन दिले. दोन्ही तालुक्यातील सर्व प्रकरणे शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत असल्याने ती व्यवस्थित हाताळुन प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेत आयोगास अहवाल सादर करावा अशा सुचना जनसुनावणीस उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भोगवटा वर्ग २ ते १ संबंधात सविस्तर माहिती दिली.
भोगवटा वर्ग २ ते १ ची सर्व प्रलंबित प्रकरणे येत्या २ महिण्यात निकाली काढा : हंसराज अहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 06, 2024
Rating: