Top News

वर्धात नदीत उडी घेतलेली युवती अखेर गवसली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वार्ड नं. 5 मधील एका उच्च शिक्षित युवतीने वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून चक्क नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक व तेवढीच मन हेलावणारी घटना घडली होती. 2 ऑगष्टला महाविद्यालयीन कामाकरिता जातो म्हणून घरून निघालेल्या युवतीने दुपारच्या सुमारास पाटाळा पुलावर येऊन वर्धा नदीत उडी घेतली. सीसीटीव्ही फुटेज मधून या तरुणीने नदीत उडी घेतल्याची स्पष्ट झाले होते. माधुरी अरुण खैरे (28) असे या नदीत उडी घेतलेल्या युवतीचे नाव आहे. 

मागील आठ ते दहा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने नदीला अथांग पाणी वाहत असल्यामुळे माधुरी चा थांगपत्ता लागत नव्हता मात्र, नदी पात्रात तीचा शोध घेणे सुरूच होते. सर्वदूर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असताना नदीचा प्रवाह वेगवान असल्याने शोध मोहीम राबविणाऱ्या पथकासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र,चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी जवळ तीचा मृतदेह नदीच्या गाळात फसून असल्याचे दिसून आले. तब्बल पाच दिवसांनी मंगळवारी सायंकाळी शोध पथकांना मृतदेह गवसला असून मृतदेह पोस्टमार्टमकरिता वरोरा येथे पाठविण्यात आला. आज गुरुवार ला दुपारी अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली.

माधुरीचे वडील अरुण खैरे मूळचे राजूर (कॉलरी) यांचे १० वर्षांपूर्वी तर आईचे मार्च महिन्यात निधन झाले होते. त्यामुळे दोघे बहीण भाऊ हे एकमेकांचा आधार बनून होते. मात्र, माधुरीने जीवनात आलेल्या नैराश्येतून टोकाचा निर्णय घेतला. उच्च शिक्षित तरुणीने परिस्थितीचा सामना करण्याऐवजी मानसिक खच्चीकरणातून नदीत उडी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post