संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसीची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे- प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसींची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे," असे प्रतिपादन मा. प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली यांनी वणी येथे आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात केले. रविवारी दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-झरी- मारेगाव च्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार मोर्चाच्या समारोपीय सभेत पुढे बोलताना ते म्हणाले," कोण संविधान मानतो व कोण संविधानाचे विरोधात आहे, हे ओबीसींनी ओळखावे व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संविधानाला मानणाऱ्या पक्षालाच मतदान करावे असे उदगार त्यांनी काढले.    
शासकीय मैदान, वणी येथून एल्गार मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मोर्चा मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला.त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला पुन्हा प्रारंभ झाला. वणी शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत लोकमान्य टिळक चौकात दाखल झाला आणि पुढे जाऊन शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ मोर्चाची सांगता झाली. ज्या ज्या चौकातून एल्गार मोर्चा गेला त्या प्रत्येक ठिकाणी विविध महापुरुषांना हारार्पण करून मानवंदना देण्यात आली.त्यांनतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सभास्थळी मोर्चा पोहोचल्यानंतर सभेला सुरुवात झाली.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे सर यांनी केले, तर प्रास्ताविक मोहन हरडे सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रविंद्र आंबटकर सर यांनी मानले.
विचारपीठावर अध्यक्ष म्हणून मा. प्रदीप बोनगीरवार, मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, प्रा. अनिल डहाके, मा.उमेश कोरराम , मा.ऍड. पुरुषोत्तम सातपुते, मा. आशिष साबरे, मा. बाबाराव ढवस हे उपस्थित होते. मोर्चात दहा हजार ओबीसी, व्हिजे, एनटी, एसबीसी समाजबांधव उपस्थित होते.


संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसीची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे- प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसीची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे- प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.