सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठी भाजपाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनांचा गवगवा करणाऱ्या रथाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. तालुक्यातील पिसगांव येथे हा रथ पोहोचला असता ग्रामस्थ संतप्त झाले. नागरिकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत रथाला गावातून पिटाळून लावले. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई, खड्डेमय रस्ते अशा अनेक समस्या आहेत. त्यात पिकविमा भरपाईही मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच मोदी सरकारचा संकल्प रथ तालुक्यातील गावा गावात जाऊन 'अच्छे दिन' आणल्याचा बाबुलबुवा करत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रथ आणणाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आधी मोठमोठ्या फेकून वशीकरण केले, आता मात्र जनतेला लुटून फसवीकरण केले जात आहे. आम्ही वैतागलो या फेकू सरकार ला असा आरोप येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी केला आहे.
तालुक्यातील समस्या सोडविण्याऐवजी मृगजळी विकास झाल्याचा भास जनते समोर ठेवत असल्याने पिसगांव व किन्हाळा येथील नागरिकांनी गावातून 'रथ यात्रा' पिटाळून लावले आहे. पिसगाव येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी पुढाकार घेत रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ही यात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची आहे? असा सवाल त्यांनी केला. नागरिकांच्या प्रश्नांमुळे सैरभैर झालेल्या रथ आणणाऱ्यांनी अखेर गावातूनच पळ काढला.
आधी मोठमोठ्या फेकून केले वशीकरण, आता मात्र जनतेला लुटून होतेय फसवीकरण - मारोती गौरकार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2023
Rating: