वणी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरात परत सक्रिय होऊ पाहणाऱ्या मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळून वणी पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहे. आंतरजिल्हा रॅकेट मधील दोन चोरट्यांना डीबी पथकाने मोठ्या शिताफिने अटक केली असून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई 20 ते 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 
वणी बसस्थानक येथून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडल्याने डिबी पथक ऍक्शन मोडवर आले आहे. शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सुधीर अरुण निखाडे यांची बसस्थानक येथे उभी असलेली मोपेड मोटरसायकल (MH 29 AY 2585) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी मोटरसायकल चा स्वतः शोध घेतल्यानंतर 20 नोव्हेंबरला ठाण्यात तक्रार नोंद केली. मोटरसायकल चोरीची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. दरम्यान, त्यांना सेवा नगर येथे राहणाऱ्या सौरभ घनश्याम भटवलकर नामक तरुणाजवळ चोरीला गेलेल्या वर्णनाची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकच नाही तर, दोन गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सौरभ भटवलकर (20) याच्या जवळून मोपेड दुचाकी (एम एच 29 ए वाय 2585) व हिरो होंडा स्प्लेंडर (एम एच 29 झेड 5938) अशा दोन मोटरसायकल जप्त केल्या असून, त्याच्यावर भादंवि च्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तक्रार दाखल असल्याचा नागपूर पोलिसांनी दिला दुजोरा  
वणी शहरात गस्त घालणाऱ्या डीबी पथकाला दिपक चौपाटी बार जवळ मोटरसायकल घेऊन उभ्या असलेल्या युवकावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या युवकाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास जवळील दुचाकीचे कागदपत्र मागितले असता तेही त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्याने मोटरसायकल चोरी केल्याचा संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्यास मोटरसायकल सह ताब्यात घेतले. त्याला खाकीचा इंगा दाखविताच त्याने नागपूर येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सतीश उर्फ शेंबड्या बाबाराव मडावी (25) रा. वार्ड क्रं.10 राळेगाव याच्या जवळून होंडा ऍक्टिव्हा (एम एच 31 डी एफ 1266) ही मोटरसायकल जप्त करून त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. नागपूर येथून वरील वर्णनाची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल असल्याचा नागपूर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
सदरची कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, डीबी पथकाचे वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम शेख, गजानन कुडमेथे यांनी केली.
वणी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या वणी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या Reviewed by सह्याद्री चौफेर on November 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.