टॉप बातम्या

महिला बचतगटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम उभारणार – पालकमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : घराचे अर्थचक्र सांभाळणाऱ्या महिलांना उद्योग सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम आणि कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी दिली.

नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, बचत गटातील महिलांच्या मानधनात वाढ केली आहे. कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग संघातील महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. या महिला बचत गटांना गोदाम आणि कार्यालय बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे. याशिवाय उमेदचे ग्रामसंघ, माविमच्या बचत गटांना देखील उद्योग उभारण्यासाठी निधी देण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले.

या योजनेंतर्गत सातेफळ येथे महिला बचत गटासाठी धान्य प्रक्रिया उद्योग गोदाम बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.
Previous Post Next Post