सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर
पुणे : कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 असून यानिमित्ताने राज्यातील लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. अशातच भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार असून रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार असल्यामुळे यात्रा काळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे देवाच्या पायावर दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे . आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देवाचा पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येणार आहे.
24 तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा , दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच कारणांसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे.
कार्तिकी यात्रा संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होणार आहे.
विठ्ठल भक्तांसाठी आनंदवार्ता! देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 17, 2023
Rating: