सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : पलटी झालेल्या ऑटो अपघातात एक जण ठार, तर चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज 4 ऑक्टोबर ला सकाळी 7.15 वाजता च्या सुमारास रांगना-नांदेपेरा मार्गावर घडली. मृतक गणपत धोंडू सातपुते (55) रा. सेलू असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ऑटो चालक शंकर पारटकर हा सकाळी 7 वाजता नेहमी प्रमाणे ऑटोमध्ये प्रवासी घेऊन सेलूहून रांगना मार्गे वणीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान, नांदेपेरा येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याने ऑटोत बसविले. त्यानंतर तो रांगना मार्गे वणीकडे ऑटो घेऊन निघाला. रांगना जवळ ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटला. यात गणपत सातपुते हा प्रवासी जागीच ठार झाला तर, वणी येथे महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ऑटोने प्रवास करणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चारही विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. निष्काळजीपणे व भरधाव ऑटो चालविल्याने चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडला असे बोलल्या जात असून पुढील तपास पोलिस करीत आहे.