काँग्रेस पाठोपाठ युवासेनेचे ठाणेदारांना समर्थन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : स्थानिक दुर्गा विसर्जन सुरु असताना शाब्दिक चकमकी दरम्यान जीवे मारण्याची धमकी; कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या रक्षकांना आकारण शिवीगाळ देणाऱ्या नगरसेवकाला पाठीशी घालणाऱ्या भाजप आमदारांनी चक्क ठाणेदाराचीच बदली करा. असा बिनकामाचा आग्रह धरल्याचा आरोप करित तालुक्यातील मनसे, काँग्रेस यांच्या पाठोपाठ आता युवासेनेने ठाणेदार यांना समर्थन देत, मारेगाव ठाणेदार खंडेराव यांची बदली करू नये, अशा आशयाचे निवेदन येथील पोलिसामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज (ता.30 ऑक्टो.) ला देण्यात आले.

शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानिक दुर्गा देवी विसर्जनानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज असता, पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी सुभाष नगर दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य तथा भाजप नगरसेवक राहुल राठोड यांनी दिल्यावरून शहरात संतापाचे वातावरण निर्माण असताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला पाठीशी घालत ठाणेदार यांची तत्काळ बदली करण्यात यावी, यासाठी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मारेगाव ठाण्यात ठिय्या मांडून कर्तव्यदक्ष ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या बदलीची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना ठाण्यात पाचारण करून रेटून धरली. व पाच तास ठिय्या दिला. मात्र, जीवे मारण्याची धमकी व अकारण शिवीगाळ केल्याने काँग्रेसने या घटनेची तीव्र निंदा करित कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर उलट कारवाई करा व ठाणेदार यांची बदली करू नका अशी मागणी केली होती. 

त्यानंतर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची नागरिकांप्रती चांगली वागणूक आहे तसेच ठाणेदार हे योग्यरीत्या आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावात न येता मारेगाव ठाणेदार यांची बदली करू नये, अशी आग्रही मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून मारेगाव युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेदार यांच्या प्रती समर्थनाचा ओघ वाढतच असल्याचे चित्र दिवासेंदिवस दिसून येत आहे.

निवेदन देताना युवासेनेचे तालुका अध्यक्ष मयूर ठाकरे, डॉ मनिष मस्की, राजू भाऊ मोरे, लक्ष्मीकांत देठे, रतन धानोरकर, पंकज नेहारे, शुभम कोंगरे, अनिकेत मानकर, यश निब्रड, गजानन ठाकरे, अंकुश जोगी, चंद्रशेखर थेरे, अमोल झोटिंग, अमोल डाहुले तथा युवा सैनिक आदींची उपस्थिती होती.


काँग्रेस पाठोपाठ युवासेनेचे ठाणेदारांना समर्थन काँग्रेस पाठोपाठ युवासेनेचे ठाणेदारांना समर्थन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.