सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
शहरातील तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके रा. आवारी ले आऊट (वणी) यांनी पोलीस स्टेशन येथे दि.7 ऑगस्ट 2023 ला दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 27/9/ 2022 पासून त्यांची स्नुषा वैशाली महेश मुके ही दोन महिन्याची गर्भवती असताना डॉ. लोढा यांच्याकडे उपचार सुरू केला.
त्यानंतर तक्रारदार यांची स्नुषा वैशाली ही तिन महिन्याची गर्भवती असताना डॉ. लोढा यांच्या खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा बाळ निरोगी व सुखरुप आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले होते मात्र, 3 डी सोनोग्राफी करण्यास सांगितले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर 21 नोव्हेंबर 2022 ला फेरतपासणी केली. त्यानंतर पुन्हा दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी सोनोग्राफी काढली तेव्हा देखील बाळ सुदृढ आहे निरोगी आहे असे सांगितले. त्यानंतर दिनांक 9 एप्रिल 2023 ला नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढली तेव्हा देखील सांगितले की बाळ सुखरूप व निरोगी आहे. त्यानंतर सुनेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिला दि. 13 मे 2023 रोजी प्रसुती करिता वणी ग्रामीण रुग्णालय येथे नेले. त्याच दिवशी दुपारी 4.49 वाजता प्रसुती झाली. बाळाचा जन्म झाला. मात्र, नवजात बाळाच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड खुपच लहान असल्याचे दिसून आल्याने डॉ. लोढा यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. कारण बाळाला अपंगत्व असल्याचे दिसून आले. 3, 6 व 9 महिन्याची सोनोग्राफी केली तेव्हा डॉ.लोढा यांनी सदरची बाब का लपवून ठेवली? त्यांनी आमची फसवणूक केली असे तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके यांनी पत्र परिषदेत सांगितले.
त्यानंतर तक्रारदार बाळाला घेऊन चक्क डॉ.महेंद्र लोढा यांच्या रुग्णालयात गेले तेव्हा डॉ. लोढा यांनी असमाधानकारक उत्तर देत निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे डॉ. लोढा यांचे वर उचित कारवाई करुन न्याय देण्याची मागणी यावेळी केली आहे.
आज घेतलेल्या पत्र परिषदेत बाळाची आई, आजी-आजोबा काका व मुके परिवारातील मंडळी उपस्थित होते.