सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा (डोलडोंगरगाव) या "पेसा" गावात काढण्यात आलेले एस सी कोतवाल भरतीचे आरक्षण रद्द करून एस.टी.साठी राखीव करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद व आदिवासी विकास परिषद, मारेगावच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले आहे.
मारेगाव महसूली क्षेत्रात येत असलेल्या मच्छिन्द्रा (डोल) या पेसा गावात कोतवाल भरती करण्यात येत आहे. मात्र,येथील भरण्यात येणारी ही रिक्त जागा पेसा गाव असल्यामुळे अनिसूचित जमाती (एस.टी) वर्गातून आरक्षित असणे आवश्यक असताना ही जागा एस सी या वर्गाच्या उमेदवारासाठी राखीव करण्यात आली आहे. पेसा कायद्यानुसार ही जागा भरण्यात येत नसल्याने येथील आदिवासी बांधवावर मोठा अन्याय होत आहे. काढण्यात आलेली एस सी वर्गातील ही जागा तात्काळ रद्द करून आदिवासी वर्गासाठी राखीव करण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद शाखा वणी व आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू,असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील कोतवालाची जागा सन 2018 मध्ये पेसा आदिवासी राखीव कोट्यातून भरण्यात आली होती, परंतु ही जागा अवघ्या दोन महिन्यात रिक्त झाली. त्यामुळे दुसरा उमेदवारास संधी उपलब्ध होती तसे, या पूर्वीचे तहसीलदार यांनी त्या उमेदवाराला सांगितले होते की, ही जागा तुला घेऊन करता येईल. मात्र, असे न होता आजतागायत ती जागा "जैसे थे" होती. परंतु नुकतेच कोतवाल भरती निघाली आणि मच्छिन्द्रा (डोलडोंगरगाव साजा) महसूल क्षेत्रात व लोक संख्येचे सोंग पुढे करून नवीन आरक्षण एस सी ची जागा काढुन मागील "त्या" उमेदवारासह आदिवासी बांधवावर हा एकप्रकारे अन्याय होत असल्याने अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांच्या नेतृत्वात आज दि.14 जुलै रोज शुक्रवारला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी परिषदचे गीत घोष, तालुका कार्याध्यक्ष भैयाजी कनाके, गंगाधर लोणसावळे (महाराज), राजू सिडाम, तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, अमोल कुमरे, मारोती आत्राम, शशिकांत आडे, कृष्णा मेश्राम, प्रशांत देवतळे, यांच्या सह मोठया संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
गांव पेसा; जागा मात्र आदिवासींना नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 14, 2023
Rating:
