उन्हाच्या तीव्रतेत शहरात हरवला पाणपोईचा आधार; सरसावणाऱ्या सामाजिक संस्था, नेत्यांना पडला विसर..


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे पुण्याचे काम समजल्या जाते. उन्हाळ्याचे दिवस, त्यात एप्रिल मे महिना म्हटलं की अंगाची लाहीलाही होतेय. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरात असलेल्या मुख्य शासकीय कार्यालय असो की सार्वजनिक ठिकाण,येथे पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.

कार्यालयात कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही येथे पाणी मिळत नाही. मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.मात्र,याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहरातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती, तलाठी कार्यालये, वनविभाग, कृषी कार्यालय, सेंट्रल बँक, स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, दुय्यम आहे. निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख यांसह इतर कार्यालयात येथे येणाऱ्यांना पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणावरील कार्यालयांमध्ये पाण्याची व्यवस्था कुठे करण्यात आली, हेच दिसून येत नाही. त्यामुळे घशाला कोरड पडत आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने अधिकारी व कर्मचारी बाहेरुन पाण्याचे जार विकत घेऊन आपली तहान भागवित आहेत. मात्र,तालुक्यातील ग्रामीण भागातून येथे आपली कामे घेऊन येणाऱ्या लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची कुठेच व्यवस्था नसल्याने त्यांना बाहेर जावून पाणी प्यावे लागत आहे. 

शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानकावरही दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करीत असतात येथेही पाण्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी महिला प्रवाशांना चहा कॅन्टीन, हॉटेलमध्ये जावे लागत असून याकडे शहरात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, नेते मंडळी यांनी ही पाठफिरवल्याचे दिसून येत आहे. आम्ही जनतेचे मात्र, जनतेसाठी काहीच नाही याचा पुढऱ्यांना विसर पडला की काय?...तूर्तास या गहन विषयाकडे संबंधितानी लक्ष देऊन शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून नागरिकांची शहरात होणारी भटकंती दूर करण्याची मागणी जोर धरत आहे. 


उन्हाच्या तीव्रतेत शहरात हरवला पाणपोईचा आधार; सरसावणाऱ्या सामाजिक संस्था, नेत्यांना पडला विसर.. उन्हाच्या तीव्रतेत शहरात हरवला पाणपोईचा आधार; सरसावणाऱ्या सामाजिक संस्था, नेत्यांना पडला विसर.. Reviewed by सह्याद्री चौफेर on April 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.