सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनाला कोळसा खाणीत अपघात

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वेकोलि (WCL) च्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जुनाड कोळसाखाणीमध्ये सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याकरिता आलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्याच वाहनाला कोळसा खाणीत भीषण अपघात झाला.
बाहुबली डोजर मशीन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनावर आदळल्याने दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. कोळशाचे रॅम तयार करणारी ही डोजर मशीन कोळसाखाणी बाहेर काढतांना उतार भागात ऑपरेटरचे मशीनवरील नियंत्रण सुटले व मशीन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनावर जोरदार आदळली. दुपारी ४ वाजता दरम्यान ही घटना घडली.या भीषण अपघातात वाहनात बसलेले चंद्रकांत वालदे व मनीष चवरे हे दोनही सुरक्षा अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम वेकोलिच्या भालर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. परंतु या घटनेमुळे कोळसा खाणींतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
काल ८ डिसेंबरला कोळसा खाणीत सुरक्षा सप्ताह असल्याने सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याकरिता गेलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्याच वाहनाला भीषण अपघात झाल्याने कोळसा खाणीतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची लक्तरं वेशीवर आली आहेत. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोळसा खाणीतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे.
बाहुबली डोजर मशीन वाहनावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने अधिकारी बचावले. मात्र या घटनेमुळे कोळसा खाणींतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून वेकोलिने कोळसा खाणींतील अंतर्गत सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनाला कोळसा खाणीत अपघात सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनाला कोळसा खाणीत अपघात Reviewed by सह्याद्री चौफेर on December 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.