चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : दारव्हा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीने सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. निवडणुकीची धामधूम जोरात असून, एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पॅनल विजयासाठी रात्रंदिवस झटत आहे. त्यातूनच विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.
१२ मे २०२२ रोजी शिवसेना समर्पित शेतकरी विकास पॅनलची बावणे कुणबी नगर परिषद हॉल, श्रीकृष्ण नगर येथे प्रचार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी वनमंत्री तथा दिग्रस विधानसभेचे आमदार संजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी प्रचार अधिक वेगाने करण्यासह विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे तालुका व शहर पदाधिकारी तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच प्रचार बैठकीत निवासी नायब तहसीलदार प्रकाश खाटीकही उपस्थित होते. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते बैठकीत सामील झाले होते. निवडणूक प्रचार बैठकीत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याने सहभागी होणे म्हणजे नियमाचा भंग आहे. हा प्रकार येथील गोपाल हिवराळे यांच्या लक्षात येताच त्यांनी दारव्हा तहसीलदारांकडे याबाबत तक्रार केली आहे.
नियमाचा भंग करून निवडणूक प्रचार बैठकीत सहभागी झालेल्या नायब तहसीलदारांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता तहसीलदारांकडून याबाबत काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रचार बैठकीत निवासी नायब तहसीलदार यांची पक्षाच्या कार्यकर्त्यां प्रमाणे उपस्थिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2022
Rating:
