ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

पुणे :
ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून २० वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माताभगिनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीदेखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून स्व. मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचाही श्री.ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांशी स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.