सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : एकाधिकारशाही गाजवणारा तो अधिकारी अखेर सेवानिवृत्त झाला. आपल्या कार्यकाळातील विविध कारामतींमुळे हा अधिकारी नेहमी चर्चेत राहिला. उर्मटपणा व अहंकारी बाणा हा त्याचा स्वभावगुण होता. आक्रमक शैलीचा तो पुरस्कर्ता होता. आक्रमक शैलीमुळे त्याने अनेकांचा रोष ओढवून घेतला. विरोधाभासी प्रवृत्तीमुळे त्याला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याचे कधी कुणाशीच पटले नाही. या अधिकाऱ्याच्या त्रासदायक वागणुकीमुळे कार्यालयीन कर्मचारीही वैतागले होते. कारण कर्मचाऱ्यांशी बोलतांना हा अधिकारी नेहमी शिवराळ भाषा वापरायचा. त्याच्या सेनिवृत्तीसाठी सर्वच आतुर झाले होते. बरं झालं रिटायर झाला, हे एकच वाक्य सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळालं. सेवानिवृत्तीचा काळ जवळ येताच त्याने टक्केवारीही वाढवली. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली. त्याच्या वाढलेल्या टक्क्यांमुळे सेवकांनी निधीची उलाढाल व कंत्राटदारांनी कामेच थांबवून दिली. विकासकामांतही गटबाजी करणारा असा हा अधिकारी होता. तो सेनिवृत्त झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या अधिकाऱ्याने अधिकाराचा वापर करत अनेक कारनामे केले, व अनेक कारनामे पचवलेही. फॅगिंग मशीन व्यवहारात त्याच्या बदलीची मागणी झाली, पण ते प्रकरण त्याने पद्धशीरपणे हाताळलं. मधातल्या काळात चौकशी समित्यांच्या चौकशीलाही त्याला सामोरे जावं लागलं, पण त्याच काहीही वाकडं झालं नाही. कार्यालयात पत्रकारांसाठी त्याने नोटीस लावून पत्रकारांची नाराजी ओढवून घेतली. शासकीय कार्यालयाला स्वतःची जहागीरदारी समजणारा हा अधिकारी कित्येकदा तोंडघशी पडला. पण अकड मात्र गेली नाही. कुणाशीही वाद घालण्यामुळे त्याचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरला. कोरोनाचे कडक निर्बंध असतांना हा अधिकारी कार्यालयात विना माक्स वावरायचा. नियमांचे पालन करण्याऐवजी नियमांना पायदळी तुडविण्याचं काम या अधिकाऱ्याने केलं. कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा पराक्रमही त्याने आपल्या अधिकाराचा वापर करून केला. वाढदिवसाचा भन्नाट सोहळा साजरा केला. कार्यालयाला एक दिवसाची अघोषित रजाच त्याने देऊन टाकली. गेटवर चपराशी तैनात केले. ते फक्त साहेबांच्या वाढदिवसाकरिता आलेल्यानाच आत जाऊ देत होते. साहेबांवर स्तुती सुमनांचा वर्षाव करणारे स्तुती पाठकाचे गोडवे माईकवरून ऐकायला मिळत होते. त्याला नाईलाजास्तव वाजवाव्या लागणाऱ्या टाळ्यांचा गडगडाट होत होता. कार्यालयात वाढदिवस साजरा करणारा हा पराक्रमी अधिकारी संपूर्ण तालुक्यात चर्चेस पात्र ठरला. या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दोन दिवसाआधी पंचायत समिती कार्यालयाला आग लागली. सर्व योजनांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज या आगीत जळून खाक झाले. ही आग कशी लागली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. या आगीबाबत या अधिकाऱ्यानेच संशय व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात असे अवचित प्रकार घडले. या अधिकाऱ्याच्या अशाच प्रतापांमुळे त्याची बढती न होता गळती झाली. त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, व याकाळात तो येथेच स्थिरावला. त्याच्या वागणुकीमुळे तर प्रत्येकाचीच तळपायाची आग मस्तकात जायची. त्याच्या शब्द प्रयोगामुळे कित्येकदा वादही उद्भवले. आता हा अधिकारी कौटम्बिक जिवनात कसा वावरेल व कुटुंबियांना कशी वागणूक देईल, ही चर्चा आता या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर ऐकायला मिळत आहे. या अधिकारयाच्या सेवानिवृती नंतर येथिलच एका अधिकारयांकडे प्रभार देण्यात आला आहे.