दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी यवतमाळ मार्गावरील राजूर फाट्यावर उभ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. होमेश मारोती टोंगे (३६) रा. सोमनाळा असे या अपघाती मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मृतक हा लालपुलिया परिसरात कामाला असल्याचे समजते. तो आपल्या कामाचे तास पूर्ण करून रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा या आपल्या गावाकडे जात असतांना राजूर फाट्यावर उभ्या ट्रकला त्याची दुचाकी धडकली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण युवकाची प्रकृती गंभीर असल्याने येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूरला रेफर केले. चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. ६ जानेवारीला राजूर फाट्यावरच भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. पळसोनी फाटा ते राजूर फाटा दरम्यान नेहमीच अपघाताच्या घटना घडत असल्याने हा एक ते दिड किमीचा रस्ता अपघात प्रवण स्थळ ठरू लागला आहे.  

वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात कामाला असलेला होमेश टोंगे हा युवक कामाच्या तासिका आटपून सोमनाळा या आपल्या गावाकडे जाण्यास निघाला. दरम्यान राजूर फाटा येथे उभ्या असलेल्या ट्रकला त्याची दुचाकी धडकली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात, व नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. परंतु उपचार सुरु असतांनाच काल ११ जानेवारीला रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक हा विवाहित असून त्याला चार महिन्यांचं छोटं बाळ आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाला काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. संसारिक जीवन अर्ध्यावर सोडून गेल्याने पत्नीलाही दुःख अनावर झाले आहे. मृतक होमेश टोंगे याच्या पश्चात आई, पत्नी व चार महिन्याचे बाळ असा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.