सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळच्या मातीतील कलावंत किती प्रतिभा संपन्न आहेत याची साक्ष या वेब सीरीजमधून पटते. ११ डिसेंबरला रात्री आठ वाजता या वेब सीरिचा प्रीमिअर शो स्थानिक एलिमेंट मॉलच्या सभागृहात पार पडला. नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील संवेदनशील कवी तथा निवेदक रुपेश कावलकर अन् चला हवा येवू द्या फेम प्रवीण तिखे यांच्या डोक्यातून ही भन्नाट कल्पना निघाली.पटकथा प्रा.पुनीत मातकर यांनी लिहिली असून संवाद लेखन प्रवीण अन् रुपेशने केले आहे. एखादी वेदना कशी निखळ निर्मितीला जन्म देते हे रुपेशने सांगितले अन् सारे सभागृह एका निरव शांततेत परावर्तित झाले होते.
या सीरिजमध्ये संवाद आणि गीत प्रवीण तिखे यांनी दिले. संगीत संतोष मानकर, गायक संदीप बिजेवार, गौरव चाटी संगीत संयोजन वैभव दुरतकर,प्रतीक ढोके, श्रेयस ढोके छाया अमित डंभारे,अक्षय डंभारे, संकलन नासिर शेख नृत्य दिग्दर्शन स्वराज भोयर,शरद सोयाम,योगिनी घावडे ध्वनी नीलेश जाधव यांनी दिला आहे.
या सीरिजमध्ये विविध पात्रे साकारण्यात आली. त्यामध्ये छबु- अपूर्वा सोनार, पाटील -अविनाश मानेकर बाल्या-लखन सोनूले रसिका- शिवानी धुमाळ - नोमूलवार तेजस- हृषीकेश व्यास लखन- सतीश पवार तानु - चारुलता पावसेकर जानराव- जनार्धन राठोड संत्या - प्रेम चक्रे अंत्या- रोशन जोल्हे पक्या - साहिल दरणे गुगल- जुगल गुंडंकवार भिकारी- गजानन जुडेकर शीतल - प्रतिभा पवार या स्थानिक कलावंतांचा सक्षम अभिनय, तुटपुंजी साधने यातून ही दर्जेदार वेब सिरीज साकारली आहे.एकूण अकरा भागाची ही मालिका दहाव्या भागात एका वेगळ्याच भावनिक वळणावर जावून पोहचते तेव्हा ही रहस्य मालिका तर नाही ना असा भास होतो.
"तूह्या कानातले डुल" आणि "देशिन का तुह्या नंबर देशिन का?" ही अफलातून गाणी, विनोदाचे जब्बरदस्त पंच आणि अप्रतिम कथानक ही या मालिकेची जमेची बाजू आहे. प्रत्येक कलावंत जीव ओतून काम करताना दिसतो. येणाऱ्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय होईल याची साक्ष काल पटली. कोरडवाहू कलावंत किती भारी असतात हेच त्यांनी दाखवून दिले. अल्पावधीतच या सीरिजला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
रूपेश कावलकर यांनी सांगितले की, ही वेबसीरिस तयार करताना सर्वात मोठे चॅलेंज होते ते अर्थकारण उभे करणे. पण आम्ही सर्व हे छंद म्हणून केलंय आणि सर्वांच्या सहकार्यातून ही वेबसिरीज तयार झाली आहे. त्यामुळे वेबसिरिज बनवताना जास्त खर्च आलेला नाही. त्यांत मी अशी माणसे निवडली की जे माझे मित्रच आहेत आणि सर्वांचा यामध्ये समान वाटा आहे आणि तसेच आम्ही वेब सिरीज फक्त युट्युबवर लॉन्च केलेली आहे जेणेकरून सर्वांना याचा आनंद घेता येईल.
यवतमाळच्या मातीतून विनोदी वऱ्हाडी वेब सीरिज "देशीन का"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2021
Rating:
