सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी चिचाेली येथील निर्दाेष व्यक्तींना बेदम मारहाण प्रकरणामुळे सध्या चांगलेच चर्चेत आले असून, अनेकांनी दाेषी असणां-या अधिकारी व कर्मचा-यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान आज चंद्रपूर जिल्हा आम आदमी पार्टीने राष्ट्रीय मानवाधिकारी आयाेग दिल्ली यांचे कडे अश्या मारहाण झालेल्या दाेन प्रकरणाच्या अनुषंगाने एक संयुक्तिक रित्या तक्रार पाठविली आहे. शहरातील गरीब कुटुंबातील समोसे विकण्याचा व्यवसाय करणारा सुरेंद्र देवडकर नामक व्यक्ती व इतर चौघे आपली झोपडी दुरुस्त करण्याच्या निमित्ताने बांबू आणण्यासाठी जुनोना जंगलात दि. 27 सप्टेंबरला गेले हाेते.
बांबू आपल्या सायकलवर बांधत असताना त्या ठिकाणी त्या परिसरातील बीट गार्ड बालाजी राठाेड व इतर तिघे तेथे आले. त्यांनी सगळ्यांना थांबवून बांबू का तोडले म्हणून सर्वांना बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा घटना स्थळावरुन त्यातील दोघे जंगलात पळून गेले, पण त्या वेळी सुरेंद्र देवडकर, किशोर ठाकूर आणि विलास मुथा यांना बेदम मारहाण (त्या ठिकाणी )करण्यात आली.
सुरेंद्र यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, तो घरी परतला नाही आणि वनविभागाचे लोक घरी येऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करतील या भीतीने तो लपून बसला. त्यातच भीतीपोटी 30 सप्टेंबरला सुरेंद्रने विष प्राशन केले, त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यांत आले. रात्री उशिरा उपचार करून ताे घरी परतला. परंतु दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबरला सकाळी 6.30 च्या सुमारास सुरेंद्रची प्राणज्याेत मालवली.
मृताची पत्नी सविता हिने पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत काढली. सरकारी रुग्णालयाने केलेल्या शवविच्छेदनात फुफ्फुसे, मांड्या आणि पाठीसह शरीराच्या विविध भागांवर अनेक जखमा आढळून आल्या, ज्याचा परिणाम सुरेंद्र देवडकर यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक मारहाणीत झाला असावा असे डॉक्टरांचे मत आहे.
मृत सुरेंद्र यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुरेंद्र यांच्यासोबत असलेल्या किशोर ठाकूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, आजही त्यांच्या पायावर पट्ट्या बांधलेल्या आहेत, त्यास चालता किंवा उठता येत नाही. तर दुसऱ्या एका प्रकरणात चंद्रपूर जवळील चिचोली गावात 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर वन परिक्षेत्र अधिकारी हे आपल्या 6 ते 7 कर्मचार्यांसह गावात पोहोचले त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर आणि संदीप आसुटकर यांना चंद्रपुरातील रामबाग वनविभागाच्या कार्यालयात अवैध शिकारीच्या संशयावरून आणले. व त्या ठिकाणी त्यांना अमानुषपणे मारहाण केली, त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर प्लास्टिकच्या काठ्यांनी वार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा आकाश चांदेकर, मंगेश आसुटकर, संदीप नेहरे यांना वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यांना ही बेदम मारहाण करण्यात आली. काहींच्या गुप्तांगावर वारंवार करंट देण्याचे अमानुष कृत्य वनकर्मचा-यांनी केले. नंतर या लोकांनी शिकार केली नसल्याचे वन अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी या लोकांना सोडून दिले.
दोन्ही घटनांमध्ये वनकर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका गरीब व्यक्तीचा खून करणे, दुसऱ्याचा पाय तोडणे, संशयाच्या आधारे ६ जणांना ताब्यात घेणे, त्यांना मारहाण करणे, गुप्तांगांना अमानुष करंट लावण्याचा प्रकार केला आहे. त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून घृणास्पद प्रकार सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी संगठित गुन्हेगारी प्रमाणे संघटीत होऊन घटना घडवून आणली आहे. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, अशा अनेक घटना या वन कर्मचाऱ्यांकडून घडवून आणल्या जातात, किंबहुना या गरीब लोकांमुळेच जंगलाचे संरक्षण होत आहे.
जल, जंगल, जमीन या लोकांचा हक्क आहे. अगोदरच सरकारने काही भांडवलदारांना कवडीच्या दराने जंगलतील खनिज संपत्ति लुटायला दिली आहे. अश्या मोठ्या कंपनी कडून सर्रासपणे वन नियमाची मोडतोड होते पण यांच्या कारवाई करण्याची हिम्मत मात्र वन विभाग कड़े नाही. या प्रकरणात पीडीत हे गरीब आणि कष्टकरी कुटुंबातून आहे.
80, 90 च्या दशकात आदिवासीबहुल भागात वन अधिकारी ज्या प्रकारे अशा घटना घडवत होते. या लोकांना खोट्या केसेसमध्ये फसवून महिलांवर अत्याचार करीत होते.त्यावेळी येथील आदिवासींनी नक्षलवाद्यांची मदत घेतली आणि आता नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे अशा भागातील आदिवासींवरील वन कर्मचाऱ्यांची दहशत संपुष्टात आली आहे पण, या मुळे नक्षलवादला चालना मिळाली. ज्या पद्धतीने वन्यप्राण्यांसाठी वनविभाग आहे, त्याच पद्धतीने मानव अधिकारांसाठी मानवाधिकार आयोग आहे.
या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून पीडित कुटुंबाला न्याय व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेवटी आम आदमी पार्टी ने केली आहे.
एका प्रकरणात एकाची हत्या व दुस-याचा पाय तोडला तर, चिचाेली प्रकरणात सहा मजुरांना बेदम मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 02, 2021
Rating:
