सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा सुरु केल्यापासून बससेवाच ठप्प पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरु आहे. खाजगी वाहतूकदारांनी या संधीचं सोन करण्याचे मनसुबे आखल्याने प्रवाशांना चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खाजगी वाहतूकदारांनी प्रवाशांची अक्षरशः लूट चालविली आहे. सणासुदीच्या दिवसांत आंदोलनाचा पवित्र घेण्यात आल्याने कित्येकांना आपल्या नातेवाईकांच्या गाठी भेटींना मुकावं लागलं. जवळपास १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने आंदोलनाची धग अद्यापही प्रवाशांना सोसावी लागत आहे. दिवाळीच्या सुट्या समाप्त झाल्याने शाळा महाविद्यालये सुरु झाले असून विद्यर्थ्यांना या संपाचा चांगलाच फटका बसला आहे. बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयात जाणेच कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता शाळा महाविद्यालयात जाण्याकरिता एसटी बस हाच एकमेव पर्याय असतो. परंतु कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेसच बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठीचा हा लढा तीव्र स्वरूपाचा असून या लढ्यात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी या लढ्याच्या यशस्वीतेकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने शासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर मोटक्याच शाळा सुरु झाल्या व विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये उपस्थिती दर्शवू लागले होते. पण आता एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवासच कठीण झाला आहे. देशात खाजगीकरणाचा सपाटा सुरु असतांना एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करण्याचा एकाकी उभारलेला हा लढा शासनावर कितपत प्रभाव पाडेल, याकडे संपूर्ण जनमानसाचे लक्ष लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने नेहमी त्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. अतिशय कमी वेतनामध्ये अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी सेवा बजावत आहे. संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांवर नेहमी अन्याय केला जतो. कोरोना काळात त्यांना घरी बसविण्यात आल्याने कुटुंबाच्या उदर्निवाहाकरिता त्यांनी मिळेल ती कामे केली. कित्येक चालक वाचकांनी खाजगी वाहने चालविली. बोनसच्या नावावर नेहमी त्यांची थट्टा केली जाते. कमी वेतनामध्ये कुटुंब चालविणेही कठीण झाले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नोकरीचीही हमी नसते. थोडी थोडकी चूकही निलंबनाचे कारण बनते. कधी ड्युटी मिळते तर कधी आल्या पावली घरी वापस जावे लागते. (वणी आगार)
अशा अनेक व्यथा अनेक वर्षांपासून ते सहन करीत आपली सेवा बजावत आहे. पण आता त्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची प्रमुख मागणी रेटून धरली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम असल्याने शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.