सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : आनंदाचे पर्व निरुत्साहित झाले असून नैराशेच्या अंधकाराने जीवन ग्रासलं आहे. जीवनात पसरलेला अंधकार प्रकाशात उजूळून निघेल ही आशा बाळगून नैराश्यातून आनंद शोधण्याची कला साधावी लागत आहे. नैराशेच्या गर्तेत आनंद साजरा करतांना किती वेदना होतात, याचा कटू अनुभव या उद्भवलेल्या परिस्थितीमुळं चांगलाच आला आहे. समतोल राखतांना तोल सुटले आहेत, पण परिस्थिती मात्र बदलली नाही. दुःख, नैराश्य पचवून आनंद साजरा करण्याचं सामर्थ्य अंगिकारावं लागत आहे. परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं, ही प्रश्नावली आता जीवनाची नियमावली झाली आहे. नैराशेच्या काळोखात आनंदाचे कारंजे उडवितांना मनाला किती खंबीर करावं लागतं, ही अवघड कलाही अवगत करावी लागली. वर्षातला सर्वात मोठा सण, ज्याच्या स्वागताला अधीर असायचं मन, पण आर्थिक परिस्थितीमुळे आनंदावरच आलं विरजण. बेरोजगारी, महागाई व निसर्गाच्या प्रकोपामुळे सर्वांचेच हात रीते झाले. आधीच बेरोजगारी त्यात सततची दरवाढ, त्यामुळे सर्वसामान्यांच्या कंबरेचच मोडलं हाड. महागाईच्या या काळात काय खरेदी करावं, ही आगतिकता सर्व सामान्यांमधून व्यक्त होत होती. दिवाळीच्या खरेदीला एकेकाळी सरसावरणारे हात आखडते झाले. त्यामुळे बाजारपेठ तर सजली, पण दिवाळीच्या खरेदी करिता दुकानांकडे सर्व सामान्यांची पाऊले नाही वळली. नापिकी व निसर्गाच्या कोपामुळे कास्तकारही तंगीतच असल्याने त्यांनीही हवा तसा खरेदीचा उत्साह दाखविला नाही. दिवाळीत कास्तकारांच्याच खरेदीमुळे अर्धी अधिक बाजारपेठ फुलून उठायची. पण रोगराई व निसर्गाच्या चक्रव्यूहात कास्तकार अडकला गेल्याने तो चांगलाच अडचणीत आला आहे. शासनानेही कास्तकाराच्या हातावर तुरी देऊन त्यांची नुसती बोळवण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा या बेरोजगारी, महागाई व नापिकीमुळे पसरलेल्या नैराशेच्या सावटात दिवाळी साजरी करण्याचं आव्हानच सर्व सामान्यांसमोर उभं झालं. आर्थिक टंचाईमुळे सर्वसामान्यांनी दिवाळीच्या खरेदी करिता पाहिजे तसा उत्साह दाखविला नाही. व्यावसायिकही व्यवसाय मंदावल्याने निराश दिसत होते. फुल विक्रेत्यांनाही आर्थिक मंदीची चांगलीच झळ सोसावी लागली. सजावटीच्या वस्तूंकडेही नागरिकांनी पाठ फिरविली. दिवाळीसाठी बाजारपेठ विविध वस्तू व साहित्यांनी सजली खरी पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नागरिकांनी खरेदी करिता पाहिजे तसा उत्साह दाखविला नाही. बेरोजगारी व त्यात गगनाला भिडलेली महागाई नागरिकांचा निरुत्साह करून गेली. दिवाळी सारखा सणही आर्थिक टंचाईमुळे नागरिकांना पाहिजे तसा उत्साहात साजरा करता आला नाही.
आर्थिक टंचाईचा बाजारपेठेला बसला फटका; व्यावसायिकांची खंत, दिवाळीची हवी तशी खरेदीच झाली नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 05, 2021
Rating:
