वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेला वजन काटा ठरत आहे अपघात प्रवणस्थळ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी वरोरा मार्गावरील टी-पॉईंट जवळ अगदी रस्त्यालगत वाहनांचा वजन काटा असल्याने खाजगी कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या वजन काट्यावर वजन करण्याकरिता नेहमी मोठी रांग लागलेली असते. वाहने अगदी रस्त्यावर रांग लाऊन उभी रहात असल्याने वाहतुकीला तर अडथळे निर्माण होतच आहे, पण वजन करणाऱ्या वाहनांच्या अवागमनामुळे काट्याजवळील मुख्य मार्गाची अवस्था कोळसा खदाणीतील रोड पेक्षाही निपटार झाली आहे. मुख्य रस्त्यावर धूळ मातीचे थर जमा होऊन छोटी छोटी ढिगारं तयार झाली असून त्यावरच दिवसातून एखाद वेळा पाणी मारले जात असल्याने दुचाकी वाहने स्लिप होऊन कित्येक दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाले आहेत. अगदीच रोडला लागून काटा असल्याने काटा केल्यानंतर वाहने कोळसा सायडींगकडे वळवतांना तीन चार वेळा मागे पुढे घ्यावी लागतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी कोंडी होतांना दिसते. काट्यापासून काही अंतरापर्यंत नेहमी धूळच धूळ पसरलेली असते. काट्यापासून समोर काळं धुकं पाहायला मिळतं. या मार्गाने जातांना नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसतो. या मार्गाने दुचाकीने जाणारा प्रत्येक जण या काळ्या धुक्यात काळाभोर होऊन निघतो. या काट्यावर वजन करण्याकरिता वाहनांची असणारी रेलचेल मोठ्या अपघाताची चाहूल देत आहे. वजन करण्याकरिता मुख्य रस्त्यावरच वाहनांची रांग लागून राहत असल्याने नेहमी याठिकाणी वाहनांचा जाम लागताना दिसतो. कोळसाखाणीतील रस्त्यासमान झालेल्या या मुख्य रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने लगतच्या गावचे सरपंच देखील जखमी झाले आहेत. या रस्त्याने दुचाकीने जाणारं एक कुटुंबही चार पाच दिवसांपूर्वी काट्याजवळ दुचाकी घसरून पडलं. दुचाकीवरील महिला चांगलीच जखमी झाली. त्यामुळे या काट्याविषयी नागरिकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. निळापूर येथील कोल वॉशरी मधून खाजगी रेल्वे कोळसा सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. कोल वॉशरी मधून कोळसा भरून येणारी वाहने रस्त्यालगत असलेल्या या काट्यावरच वजन करतात. त्यामुळे हा काटा आता अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. या काट्यावर काटा करण्याकरिता सदैव वाहनांचा जमावडा रहात असल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे धुळीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या काट्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. काळ्या कोळशात सर्वांचेच हात काळे होत असल्याने कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर अनियंत्रित कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. वाहनांचा हा वजन काटा त्याच धोक्याची घंटा असून रस्त्यालगत असलेल्या या वजन काट्याची संबंधितांनी वेळीच दखल न घेतल्यास सर्वांनाच त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेला वजन काटा ठरत आहे अपघात प्रवणस्थळ वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेला वजन काटा ठरत आहे अपघात प्रवणस्थळ Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.