उकणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले ठिकठिकाणी खड्डे, निळापूर ग्रामपंचायतने दिला चक्का जाम आंदोलनाचा इशारा
वणी, (१२ ऑक्टो.) : वेकोलिच्या कोळसाखाणींकडे जाणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून दुचाकी वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवितांना कित्येक दुचाकीधारकांना अपघातही झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे वेकोलि मात्र जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वेकोलिला नागरिकांच्या जीवाची पर्वाच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. वेकोलि फक्त खदाणीतून कोळशाची वाहतूक करण्यावरच भर देत आहे. त्याकरिता रस्त्यांची चाळणी झाली तरी चालेल, ही वेकोलिची मानसिकता झाली आहे. वेकोलिने गावकऱ्यांचे हित जोपासणे बंद केले आहे. हे रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करून वेकोलिने सिद्ध केले आहे. उकणी कोळसाखाणी कडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वेकोलिच्या दुर्लक्षितपणामुळे कोळसाखाणींकडे जाणाऱ्या रस्त्यांची फारच बिकट अवस्था झाली आहे. वणी वरून उकणी कडे जाणाऱ्या मार्गावर कोलारपिंपरी, पिंपळगाव, जुनाड व उकणी या खदाणी आहेत. या कोळसाखाणी मधून दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. या सुसाट वाहनांचा रस्त्यावरील गावाला तर त्रास होतोच, पण रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे गावकऱ्यांचे या रस्त्यांनी जाणे येणे कठीण झाले आहे. वणी उकणी या मार्गावर निळापूर, गोवारी, ब्राह्मणी, कोलेरा, पिंपरी, प्रगतीनगर, पिंपळगाव, बोरगाव, जुनाड व उकणी ही गावे येतात. गावातील नागरिकांना प्रतेकच वस्तूंची खरेदी करण्याकरिता वणीला यावं लागतं. पण या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरील प्रवास आता जिकरीचा झाला आहे. या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत या रस्त्यावर नेहमी किरकोळ अपघात होत असतात. या रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याची वेकोलि तसदी घेत नसल्याने निळापूर ग्रामपंचायतेनेच आता वेकोलि विरुद्ध एल्गार पुकारला असून रस्त्याच्या दुरूस्तीकरणा करिता १४ ऑक्टोबरला निळापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. वेकोलिचे उप क्षेत्रीय प्रबंधक यांना निळापूर ग्रामपंचायतेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून निळापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उकणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खाड्यांमुळे कित्येक दुचाकी वाहनांना अपघात झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे नेहमी वेकोलिचे लक्ष वेधण्यात आले. २ ऑगस्ट व २४ ऑगस्टला ग्रामपंचायतेने वेकोलीला पत्र पाठवून रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यास सांगितले. पण वेकोलिने नेहमी ग्रामपंचायतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. २८ ऑगस्ट ला निळापूरचे सरपंच पूजा बोढाले यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनही करण्यात येणार होते. पण कोरोनाचा काळ असल्याने ठाणेदारांच्या सूचनेमुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. पण वेकोलिने रस्ता दुरुस्ती करण्याकडे कायम दुर्लक्ष केल्याने १४ ऑक्टोबरला ग्रामपंचायतेच्या वतीने निळापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तशा सूचनाही ग्रामपंचातेने वेकोलि व स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यास वेकोलि लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्रामपंचातेने हा चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उकणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले ठिकठिकाणी खड्डे, निळापूर ग्रामपंचायतने दिला चक्का जाम आंदोलनाचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 12, 2021
Rating:
