सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील पांचाळा या गावातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावांमध्ये गेलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन या तलावात गेली त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मोबदला न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे
यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन अधिकारी व महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून मोबदला तात्काळ देण्याची आज मागणी केली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत ६०.१३ लक्ष रुपये खर्च करून जलसंधारण विभाग चंद्रपूर यांचे मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात झालेली आहे. सदरहु तलावाचे बांधकाम सुरु असताना बहुतांशी जमीन सरकारी असल्याचे व पूर्णपणे पडीत असल्याचे सरपंच यांनी प्रशासनास सांगितले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी भेट दिली असता ती जमीन काही शेतकऱ्यांची असल्याचे माहिती मिळाली. जमीन गेलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मोबदल्याची मागणी केलेली होती.
संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मोबदला मिळेल असे आश्वासन दिले होते परंतु अजून पावेतो कोणत्याही प्रकारचा मोबदला सदरहु शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे जमीन गेलेले शेतकरी हवालदिल झाले असून तात्काळ जमिनीचा मोबदला देण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात पुनर्वसन अधिकारी व महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करून तात्काळ मोबदला देण्याची मागणी केली.
उपराेक्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा अन्यथा उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू झोडे व शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.
पांचाळा गावातील गांव तलावात गेलेल्या जमिनीचा तातडीने मोबदला द्या -राजु झोडेंची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2021
Rating:
