वणी उपविभागात राजकीय पक्षांच्या मेळाव्यांची जत्रा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (०९ सप्टें.) : यवतमाळ जिल्ह्यातील तीन तालुक्याचा परीघ बनलेल्या ब्लॅक डायमंड वणी उपविभागात राजकीय पक्षांनी पक्ष संघटनेची मोट बांधण्याची धडपड अन त्यातून होणारी धावपळ सुसाट चालविली आहे.

कोरोना मुळे गर्दी नको असे आवाहन असतांना, या जिवघेण्या रोगाचे भय अजूनही सर्वांच्या उरावर बसून राहताना राजकीय पक्ष मात्र मेळावे घेण्यात मशगुल झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट वेटिंग वर आहे. ती केव्हा येईल अन किती प्रेताचे ढिगारे पुन्हा उभे होईल याची धास्ती सर्वत्र आहे, किंबहूना लाटेचे काही भागात आगमनही झाले आहे. मात्र, असे असतांनाही राजकीय पुढाऱ्यांना या महामारीचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे वणी उपविभागात बघायला मिळत आहे. येथील नेत्यांचे बेभान वागणे हे सिद्ध देखील करीत आहे.
       
मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या कोरोना बाबत दक्षता पाळण्याचे पोटतिडकीचे आवाहन येथील राजकीय पक्ष आडयाफाट्यावर टांगून ठेवत आहे,अन जोरदार शक्तिप्रदर्शन दाखवीत शेकडो लोकांचे पक्ष मेळावे मनसोक्त भरविण्यात मशगुल होत आहे.
येत्या काळात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षाने मोट बांधण्याचे मनसुबे चालविले आहे. त्यासाठी कार्यकर्ता मेळावे, शिबिर,मोर्चे,आंदोलन या माध्यमातून कार्यर्त्यांचा जमघट भरविणे हे जीवघेण्या कोरोना काळात पहावयास मिळते आहे.

कोरोना सारख्या गहन अन गंभीर प्रश्नाला राजकीय पक्ष पद्धतशीर बगल देत आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करताहेत. वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांची घरघर लागली आहे. स्वपक्षांचे अनेक कार्यकर्ते बॅकफूट वर आहेत. त्यामुळे अनेक पक्षांची अवस्था "बुडत्याचे पाय डोहाकडे" अशी झाली आहे. त्यामुळेच कोरोना काळात आणि भितिदायक वातावरणात सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे, शिबीर, आंदोलनाचे भरपूर पेव फुटले आहे. नेत्यांची ही राजकीय गर्दी येथे चिंतेत भर टाकण्याचे 'महान कार्य' करीत आहे.
     
मागील दोन वर्षांपासून कोरोना चे भूत सर्वांच्याच मानगुटीवर बसले असतांना अनेकांच्या कुटुंबातील प्रामुख्याने "कर्त्यांनी" जीव गमावला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराने बहुतांश जणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. व्यवसायधारकही आर्थिक डबघाईस येत असून, अनेकांच्या हातातील काम रिकामे झाल्याने बेरोजगारीचा आलेख मोठा चिंताग्रस्त करणारा आहे. परंतु राजकीय पक्षांना याचे तिळमात्र घेणेदेणे नाही. या संकटाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत रिकामे झालेल्या बेरोजगारांना आपले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा कठपुतली सारखा उपयोग व उपभोग करवून घेत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हा 'राजकीय खेळ' मस्त चालविला असल्याने कोरोनाची तिसरी लाट मात्र,सर्वांच्या जीवनाच्या वेशीवर उभी आहे. हा संभाव्य धोका सर्वांचा लक्षात असूनही,सर्वच पक्षाच्या राजकीय पुढारींना याचे जाणीवपूर्वक विसर पडल्याचे दिसून येत आहे.
     
वणी-झरी -मारेगाव येथे होत असलेल्या भरपूर मानवी जमघटा वरून हे सष्ट निदर्शनास येत आहे. येणारा काळ कोरोनाची धोक्याची भयंकर घंटा वाजत असतांना त्याचा भेसूर घंटानाद आवाज न ऐकता मन मानेल तिथे हे मेळावे घेण्याचा सपाटा सुरू आहे.
     
सोहळे,मेळावे, राजकीय समारंभ टाळण्यासाठी ना. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पोटतिडकीने सूचना करताहेत मात्र याकडे वाकुल्या दाखवीत राजकीय पक्षांनी गर्दी जमविण्याचा सपाटा सुरू केला आहे. मोठी धुमच ठोकली आहे. कोरोना सारख्या संसर्गाने आता काही ठिकाणी पाय पसरणे सुरू केल्याने अन मागील लाटेचा अतिशय विदारक अन भयाण अनुभव उराशी असतांनाही सर्व राजकीय पक्ष,संघटनांनी गर्दी होणारे कार्यक्रम स्थगित करण्यावर गंभीरपणे विचार करण्याची खरी गरज आता निर्माण झाली आहे. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आत्मचिंतन करावेच लागेल. उपविभागात मानवी जथ्याचा आगडोंब माजविणाऱ्या,गजहब अन तौबा गर्दी भरविणाऱ्या पुढाऱ्यांनी खरंतर हे सर्व टाळायला हवं. पण लक्ष्यात कोण घेणार .. ..!

कोरोनाच्या या भयावह स्थितीत सर्वच राजकीय पक्षांची अवस्था "उतावीळ नवरा, गुडघ्याला बाशिंग" अशी झाल्याचे दिसून येत आहे. यातून कोरोना चा उद्रेक झाला अन कार्यकर्ते स्वर्गवासी झाले तरी राजकिय नेते शेवटी शोकसभा घेऊनही आपला राजकिय फायदा करून घेण्यात मागेपुढे पाहणार नाही एवढे मात्र निश्चित.
वणी उपविभागात राजकीय पक्षांच्या मेळाव्यांची जत्रा वणी उपविभागात राजकीय पक्षांच्या मेळाव्यांची जत्रा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.