जातीनिहाय जनगणना व राजकीय आरक्षणाकरिता ओबीसी महासंघाचे तहसील कचेरीसमोर निदर्शने

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२० सप्टें.) : केंद्र शासनाने आगामी जनगणना करतांना इतर मागासवर्गीय संवर्गाची (ओबीसी) जातीनिहाय जनगणना करून ओबीसींची स्वतंत्र कॉलममध्ये नोंद करावी, ही अनेक दिवसांपासूनची मागणी असतांना देखिल याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. ओबीसींची जातीनिहाय आकडेवारी निश्चित नसल्याने त्यांचे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ओबीसी समाजाने जातीनिहाय जनगणना व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने व मोर्चे काढले आहेत. आता या मागण्यांना घेऊन ओबीसी समाज आक्रमक झाला असून येत्या २२ सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर निदर्शने देण्यात येणार आहे. तसेच ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात जिल्हा व तालुका कचेरीसमोर दुपारी १२ वाजता निदर्शने देण्यात येणार असल्याची माहिती विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 

केंद्र शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे. भारतीय संविधानाच्या कलम २४३(ड)(६) व कलम २४३(ट)(६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला ग्रामपंचात, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के राजकीय आरक्षण राहिल अशी तरतूद करावी. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याकरिता राज्यघटनेमध्ये तशी तरतूद करावी किंवा सुधारणा करून केंद्र शासनाने ओबीसींना न्याय मिळवून द्यावा. या मागण्यांना घेऊन २२ सप्टेंबरला ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येणार असून तालुका कचेरीसमोरही निदर्शने देऊन केंद्र शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने देण्यात येणार आहे. 

या निदर्शनात ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. भालचंद्र चोपणे, विजय पिदूरकर, डॉ. मोरेश्वर पावडे, ऍड. देविदास काळे, गोविंदराव थेरे, गणपत लेडांगे, प्रा. टिकाराम कोंगरे, दिनकर पावडे, विलासराव मांडवकर, रवि देऊळकर यांनी केली आहे.
जातीनिहाय जनगणना व राजकीय आरक्षणाकरिता ओबीसी महासंघाचे तहसील कचेरीसमोर निदर्शने जातीनिहाय जनगणना व राजकीय आरक्षणाकरिता ओबीसी महासंघाचे तहसील कचेरीसमोर निदर्शने Reviewed by सह्याद्री चौफेर on September 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.