सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१९ ऑगस्ट) : सर्वत्र अतिवृष्टीने नदी नाले भरून वाहत असल्याचे चित्र असून महागांव तालुक्यातील भांब येथील असेच चित्र असतांना एका १९ वर्षीय रोहन भालेराव या युवकाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्यासह भांब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, आज सकाळी ११:३० च्या सुमारास रोहण भालेराव (१९) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जातो म्हणून घरुन गेला. काही वेळाने गावातील मुलांनी धावत येऊन रोहण पुराच्या पाण्यात बुडत आहे, त्याला वाचवा असे ओरडत सांगितले. यावरुन काही धाडसी युवकांनी गावालगत असलेल्या सिमेंट बंधाऱ्या च्या पाण्यात त्याचा शोध घेतला. परिसरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शोध कार्याला अडचणी येत असल्याने त्याचा कुठेच थांग पत्ता लागला नाही. परंतु १२:३० वाजताच्या दरम्यान, पाण्यातील खोल भागात एका आडव्या पडुन असलेल्या झाडालगत रोहण चा मृत्यूदेह अडकून असल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सवना येथे पाठवण्यात आले अशी माहिती डीबी नाईक यांनी दिली.
रोहण हा तुळशीराम यादव भालेराव यांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली. या दुःखद घटनेने भालेराव कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी गावाकऱ्यांनी प्रभू चरणी प्रार्थना केली.