सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०३ ऑगस्ट) : तालुक्यातील बोर्डा या गावात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून कुणालाही न जुमानता सर्हास दारू विक्री केली जात आहे. अवैध दारू विक्रीच्या या धंद्यात गावातील अनेक हात गुंतले असून त्यांना गाव पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. या गावातील एक महिलाही अवैध दारू विक्रीच्या धंद्यात सक्रिय असल्याचे समजते. बोर्डा हे अवैध दारू विक्रीचे मुख्य ठिकाण झाले असून लगतच्या गावांमध्ये येथूनच दारू पुरविली जात असल्याची माहिती मिळाली आहे. जवळपासच्या गावांमधील नागरिकही दारूची तहान भागविण्याकरिता बोर्डा या गावात रोजची हजेरी लावतात. अवैध दारू विक्री ही राजरोसपणे केली जात असून "भैया हमरे मुखिया फिर डर काहेका," या तोऱ्यात अवैध दारू विक्रेत्यांचं चांगभलं सुरू आहे. गावात अवैध दारू विक्री सुरु असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या, पण या तक्रारींची कधी दखलच घेण्यात आली नाही. गावातच दारू मिळत असल्याने शेतकरी, कष्टकरी व मजुरदार वर्ग नशेत तर्रर्र रहात असल्याचे दिसून येते. गावातील तरुण व कोवळ्या वयातील मुलांनाही दारूचे व्यसन जडू लागले आहे. दिवस उजाडताच दारूचा घोट घेतल्या जात असल्याने कामधंद्यावर जाण्याचीही शुद्ध रहात नाही. मजुरीतून मिळालेल्या पैशातूनही आधी दारूची तलब भागविल्या जात असल्याने कुटुंबाची परवड होतांना दिसत आहे. चार पावलावर मिळते दारू, घटक्याघटक्यातच जाते बाळू अशी परिस्थिती आज बोर्डा या गावात निर्माण झाली आहे.
या गावात मागील अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्री जोरात सुरु आहे. पुरुषांबरोबर एक महिलाही या अवैध दारू विक्रीच्या धंद्यात उतरली आहे. गावात अवैध दारू विक्री सुरु असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला करण्यात आल्या, पण दारू विक्री जैसे थे च सुरु आहे. काही वदरहस्तांचे आशीर्वाद या अवैध दारू विक्रेत्यांना लाभले आहेत. त्यामुळे ते कुणालाही न जुमानता काळ्या बाजारात दारु विकत आहेत. आजूबाजूच्या गावातील नागरिकांची दारूची तहानही बोर्डा या गावातूनच भागवली जाते. अतिशय निडर होऊन व गावात डेरे टाकून दारू विक्री केली जात असतांनाही त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, याचेच नवल वाटते. गावातील लोकप्रतिनिधींनीही गावात अवैध दारू विक्री सुरु असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गावातील काही सुज्ञ नागरिक व महिलांनीही अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता आवाज उठविला, पण त्यांचा आवाजच दाबल्या जात असून त्यांची हाक कुणीही ऐकायला तयार होत नसल्याचे गावातील नागरिक उघडपणे बोलत आहे. गोरगरिबांचे संसार उद्धस्त करू पाहणारी बोर्डा येथील अवैध दारू विक्री बंद करून अवैध दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
वणी तालुक्यातील बोर्डा या गावात अवैध दारू विक्रीला उधाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
