सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०३ ऑगस्ट) : अवैध विक्री करिता देशी दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. साखरा या गावात अवैध विक्री करिता देशी दारूच्या शिश्या घेऊन जात असतांना या दोघांनाही पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कुणालाही संशय येऊ नये म्हणून पोत्यात देशी दारूच्या शिश्या भरून ते पायी गावाकडे जात होते. पोलिसांनी साखरा बस निवाऱ्याजवळ त्यांना अडवून त्यांच्याकडील देशी दारू जप्त केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही आज ३ ऑगष्टला ११.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.मुकुटबन पोलिसांना दोन इसम साखरा या गावात अवैध विक्रीकरिता दारू घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी या मार्गावर सापळा रचून येणाऱ्या जाणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली. साखरा बस निवाऱ्याजवळ दोन इसम संशयास्पदरित्या साखरा गावाकडे जातांना आढळून आले. त्यांच्यापैकी एका जवळ पांढऱ्या रंगाचे पोते होते. तर एका जवळ पिवळ्या रंगाचा थैला होता. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची नावे विचारली असता त्यांनी उत्तम आनंदराव येलोरवार (३८) व अतुल केशव सोयाम (२४) दोघेही रा. साखरा ता. वणी अशी सांगितली. पोत्यामध्ये व थैल्यात काय आहे, असे विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पोत्याची व थैल्याची झडती घेतली असता पोत्यामध्ये देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ शिश्या आढळून आल्या. तर थैल्यामध्ये १८० मिली क्षमतेच्या २० शिश्या आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून ६८ देशी दारूच्या शिश्या किंमत ४ हजार ८० रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोरात सुरु असून दारू विक्रीच्या धंद्यात अनेक हात सरसावले आहेत. ग्रामीण भागाकडे पोलिसांचे लक्ष जात नसल्याने गाव खेड्यांमध्ये दारू विक्रीला उधाण आले आहे. नानाविध शकली लढवून गावांमध्ये दारूची तस्करी केली जात आहे. अवैध दारू विक्रीच्या धंद्यातून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेक वदरहस्त या धंद्यात उतरले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी ग्रामीण भागात होणारी दारूची तस्करी रोखण्याकरिता पाऊले उचलली आहेत. आज ग्रामीण भागाकडे जाणारी दारू पकडून पोलिसांनी आपले इरादे स्पष्ट केले आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात नव्याने मुकुटबन येथे रुजू झालेले ठाणेदार अजित जाधव, पोउपनि युवराज राठोड, पोहवा जितेश पानघाटे, संतोष मडावी यांनी केली. पुढील तपास बिट जमादार जितेश पानघाटे करीत आहे.
अवैध विक्री करिता दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना मुकुटबन पोलिसांनी केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
