सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (२३ जुलै) : मारेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमधील विजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनी विषयी नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे.मागील काही महिन्यांपासून या गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरु असून दिवसातून अनेकवेळा अकारण वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून वीज प्रवाहात अडथळे ठरणारी जुनी रोहित्रे बदलवून अनेक तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण केली. तरीही ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील जनतेला विद्युत पुरवठा खंडित होण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पाण्याच्या दिवसांत गाव शिवारात विषारी व सरपटणारे जीव मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे रात्री बेरात्री वीज प्रवाह बंद होत असल्याने ग्रामीण जनतेला भितीच्या सावटात रात्र काढावी लागत आहे. वारंवार विज पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर न झाल्यास वीज वितरणच्या मारेगाव उपकेंद्राला घेराव घालण्याचा इशारा ग्रामीण जनतेने दिला आहे.
मोरगाव तालुक्यातील बहुतांश गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनता चांगलीच वैतागली आहे. दिवसातून अनेकवेळा वीज प्रवाह खंडित होतो. मागील काही महिन्यांपासून विजेचा हा लपंडाव सुरु आहे. पावसाळ्यापूर्वीची तांत्रिक दुरुस्तीची कामे पार पडल्याचे वीज वितरणकडून सांगण्यात येत असले तरी तांत्रिक बिघाड येतच असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामवासी कमालीचे संतापले आहेत. मारेगाव तालुक्यातील मंगरूळ, कोलगाव, वेगांव आदी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी रोष दिसून येत आहे. वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर न झाल्यास वीज वितरणच्या मारेगाव उपकेंद्राला घेराव घालण्याचा इशारा ग्रामवासियांनी दिला आहे.