सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२३ जुलै) : वणी घुग्गुस राज्य महामार्गावरील ब्राह्मणी फाटा येथील एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलेल्या वाहनामध्ये पेट्रोल ऐवजी पाणी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून वाहन काही अंतरावर जाऊन बंद पडल्याने ग्राहकाच्या हा प्रकार लक्षात आला. बऱ्याच दुचाकी व चार चाकी वाहनांनी या पेट्रोल पंपवरून पेट्रोल भरले असल्याचे कळते. या पेट्रोलपंप वरील पेट्रोल मशीन मधून पेट्रोल ऐवजी पाणी येत असल्याच्या वाहन धारकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पंप व्यवस्थापकाने सदर मशिनमधून पेट्रोल भरणे बंद केले, व पेट्रोल टाकीची तपासणी केली. दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पेट्रोल टाकीत पाणी गेले असावे असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. ब्राह्मणी फाट्यावर आर.के. सुंकुरवार यांच्या मालकीचे पेट्रोलपंप आहे. आज एका ग्राहकाने या पेट्रोलपंपावरून आपल्या कारमध्ये १० लिटर पेट्रोल भरले. कार काही अंतरावर जात नाही तोच अचानक बंद पडली. कार चालकाने फिल्टरपंप जवळून एअर उडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला फिल्टरपंप मधून पेट्रोल ऐवजी पाणी निघत असल्याचे दिसून आले. कार चालकाने पंप नोझलचा पाईप काढून त्यातून एका बॉटलमध्ये पेट्रोल काढले असता पेट्रोलमध्ये पूर्ण पाणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नोझल पाइपमधून दोन बॉटल भरल्या व सरळ पेट्रोलपंप गाठले. ग्राहकाने नुकत्याच भरलेल्या पेट्रोलमध्ये पूर्ण पाणी असल्याचे सांगत नोझल पाईपमधून पाणी निघाल्याचे व्हिडीओ चित्रीकरण पंप व्यवस्थापकाला दाखविले. तसेच पेट्रोल मशिनमधून पेट्रोल ऐवजी पाणी येत असल्याचे व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर या मशिनमधून अन्य वाहनांमध्ये पेट्रोल न भरण्याचेही सुचविले. पण बऱ्याच दुचाकी वाहनांमध्ये या मशिनमधून पेट्रोल भरल्याचे निदर्शनास आले आहे. पेट्रोलपंप धारकांच्या दुर्लक्षितपणामुळे ग्राहकांची तर फसवणूक होतेच, पण वाहनांमध्येही मोठा बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारमध्ये आधी पेट्रोल कमी असल्याने इंजिनपंपमध्ये निव्वळ पाणी आल्याने हा प्रकार चटकन ग्राहकाच्या लक्षात आला. व ग्राहकाने पेट्रोलपंप धारकाच्याही हा प्रकार लक्षात आणून दिला. नाही तर कित्येक वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी पाणी भरल्या गेले असते.