टॉप बातम्या

शासनाने मृतक अविनाशच्या कुटुंबियांना केली १५ लाखांची मदत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२३ जुलै) : १० जुलै ला पिवरडोल येथील वाघाचा हल्ल्यात १८ वर्षीय तरुणाला वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. यावेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत, वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवर गावकरी ठाम होते. पांढरकवडा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

वनविभागाचे एसीएफ लोणकर यांनी वाघाला पकडून स्थानबद्ध करण्याचे आश्वासन देत जंगली जनावरे शेतशिवाराकडे येणार नाही, याकरिता ताराचे कुंपण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्याच वेळी कुटुंबियांना १५ लाखांची आर्थिक मदत देण्याबरोबरच मृतकाच्या बहिणीला वनविभागात नोकरी देण्याचे लिखित आश्वासनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर (दि.१२) जुलै पिवरडोल या शेतशिवारात रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या नरभक्षक 'रंगा' नावाच्या वाघाला पकडण्यात आले. या घटनेला आता दहा ते बारा दिवस होत आहे. परंतु सर्वांची नजर ज्या मदतीकडे असतांना आज दि. २३ जुलै रोजी पिवरडोल ग्राम पंचायत येथे १५ लाख रुपयाचा धनादेश वनविभागातर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते लेनगुरे परिवाराला सुपूर्द करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच सुरेखा निखाडे, उपसरपंच मोहन गुरनुले, ग्रा.प. सदस्य दिगाबर घाडे, पोलीस पाटील उत्तम भोयर, वनविभाग R.F.O मेहरे साहेब, गुजर साहेब, पिकलीवार साहेब, पं. स. सभा. राजेंद्र गोंडरवार आदी उपस्थित होते.

सूत्राच्या माहितीनुसार, मुलीचे वय १८ वर्ष नसल्याने वडिलांना सध्या वन मजूर म्हणून वनविभागाने कामावर घेतले असून, मृतकाच्या बहिणीला १८ वर्ष पूर्ण झाले की, वनविभाग मुलीला कायम स्वरुपी घेण्यात येईल अशी माहिती मिळाली.
Previous Post Next Post