अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला,महसूल विभाग व डीबी पथकाची संयुक्त कार्यवाही; मुदत संपलेल्या रॉयल्टीवर सुरु होती रेतीची वाहतूक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१८ जुलै) : वाळू माफियांवर महसूल विभाग व पोलिस प्रशासन वॉच ठेऊन असतांना देखील रेती तस्करीचे प्रकार सुरूच आहेत. रेतीची चोरी करणाऱ्यांवर धडक कार्यवाही करून रेती चोरी करणाऱ्यांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या. रेती तस्करीला आळा बसावा म्हणून महसूल विभागाने रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा देखील उगारला. महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांना सोबत घेऊन अवैध रेतीचे उत्खनन करणाऱ्या ठिकाणी धाडीही टाकल्या. अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची धारपकडही सुरु केली. रात्रीची गस्त घालून रेती चोरून नेणाऱ्या कित्येक वाहनांवर कार्यवाही देखील करण्यात आली. पण तरीही रेती चोरीचे प्रकार सुरूच आहे. रेती तस्करीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने तस्कर कोणतीही जोखीम पत्करायला तयार होतात. रेतीची चोरी करण्याकरिता विविध शकली लढविल्या जातात. रॉयल्टीचा कालावधी संपला असतांना देखील त्याच रॉयल्टीचा आधार घेऊन रेती चोरी करण्याचे डाव साधले जात आहे. अशाच एका मुदत संपलेल्या रॉयल्टीवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे. डीबी पथक व महसूल विभागाने संयुक्त कार्यवाही करीत वाळू माफियांचा रेती चोरीचा हा डाव हाणून पाडला आहे. ही कार्यवाही १७ जुलैला दुपारच्या सुमारास संविधान चौका जवळ करण्यात आली. 

डीबी पथक मुख्य मार्गाने गस्त घालत असतांना वरोरा कडून भरधाव हायवा ट्रक यवतमाळ बायपास मार्गाकडे वळतांना पोलिसांना दिसला. पोलिसांनी या ट्रकला थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये रेती भरली असल्याचे आढळून आले. ट्रक चालकाकडे रेतीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता तो गोंधळल्यागत उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी तहसीलदार शाम धनमणे यांना फोन करून या प्रकरणाबाबत अवगत केले. तसेच त्यांना घटना स्थळावर पाचारण केले. शहरात गस्तीवरच असलेल्या तहसीलदारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तहसीलदारांनाही ट्रक चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तहसीलदारांनी ट्रक चालकाकडे रॉयल्टी मागितली असता चालकाने मुदत संपलेली रॉयल्टी तहसीलदारांच्या हातात दिली. तहसीलदारांना हा रेती चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी MH ३४ AB ७७७९ या हायवा ट्रकला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. या ट्रकमध्ये ५ ब्रास रेती असल्याचे उघडकीस आले आहे. या हायवा ट्रकवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
सादर कार्यवाही तहसीलदार शाम धनमणे, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव व डीबी पथकाने केली आहे.
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला,महसूल विभाग व डीबी पथकाची संयुक्त कार्यवाही; मुदत संपलेल्या रॉयल्टीवर सुरु होती रेतीची वाहतूक अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला,महसूल विभाग व डीबी पथकाची संयुक्त कार्यवाही; मुदत संपलेल्या रॉयल्टीवर सुरु होती रेतीची वाहतूक Reviewed by सह्याद्री चौफेर on July 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.