शेतशिवारांना तारांचे कुंपण व मृतकाच्या बहिणीला नोकरी देण्याचे वनविभागाचे आश्वासन

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१० जुलै) : झरी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अठरा वर्षीय तरुणाचा वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये वनविभागाविषयी चांगलाच रोष दिसून येत होता. गावशिवारात वाघाचे वास्तव्य असल्याच्या अनेक तक्रारी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या होत्या. पण वाघाचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी झरी, मुकुटबन, पाटण व मारेगाव येथील पोलिसांची कुमक मागवून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. पांढरकवड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी जमावाला शांत करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवर गावकरी ठाम होते. पांढरकवडा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. वनविभागाचे एसीएफ लोणकर यांनी वाघाला पकडून स्थानबद्ध करण्याचे आश्वसन देत जंगली जनावरे शेतशिवाराकडे येणार नाही याकरिता ताराचे कुंपण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच १५ लाखांची आर्थिक मदत देण्याबरोबरच मृतकाच्या बहिणीला वनविभागात नोकरी देण्याचे लिखित आश्वासनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. 
पिवरडोल गावातील अविनाश पवन लेनगुरे हा अठरा वर्षीय तरुण काल ९ जुलैला रात्री ९ वाजता गावालगतच्या शेतशिवारात शौचास गेला असता त्याठिकाणी दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला फरफटत शेतालगतच्या झुडपात नेऊन ठार केले. अविनाश बराच वेळ होऊनही घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावातील काही लोकांना घेऊन शेतशिवारात त्याचा शोध घेतला. शेतशिवारात काही अंतरावर त्यांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. पायाच्या ठशाच्या दिशेने गावकरी गेले असता त्यांना रक्ताचे डाग व अविनाशचे साहित्य आढळून आले. आणखी समोर गेले असता त्यांना झुडपात वाघ दिसला. अविनाशला वाघाने ठार केल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती गावातील इतर लोकांना दिली. गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी आले. गावकऱ्यांनी वाघाला पिटाळून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण वाघ मृतदेहापासून हटतच नव्हता. गावकऱ्यांनी वन विभागालाही घटनेची माहिती दिली. वनविभागाचीही टीम घटनास्थळी आली. पण ते ही वाघाला पिटाळून लावण्यात अपयशी ठरले. सकाळपर्यंत वाघ मृतदेहाचे लचके तोडत राहिला. दुसऱ्या दिवशी शर्थीच्या प्रयत्नानंतर घटनास्थळावरून वाघाला पिटाळून लावण्यात वनविभाग व गावकऱ्यांना यश आले. या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले. गावातील नागरिकांमध्ये वाघाच्या या हल्ल्याने चांगलीच भीती निर्माण झाली. वाघाचा जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वनविभागाचे एसीएफ लोणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन दिलेल्या लिखित आश्वासनानंतर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. शेत शिवाराकडे जंगली श्वापदे येणार नाही याकरिता तारांचे कुपन करून देण्याचे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
शेतशिवारांना तारांचे कुंपण व मृतकाच्या बहिणीला नोकरी देण्याचे वनविभागाचे आश्वासन शेतशिवारांना तारांचे कुंपण व मृतकाच्या बहिणीला नोकरी देण्याचे वनविभागाचे आश्वासन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.