सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२९ जुलै) : नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना फसविले आहे. एका युवकांकडून ३० हजार रुपये घेऊन त्याला कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून बनावट नियुक्तीपत्र ही दिले. मात्र, तिथे कामावर गेलेल्या युवकयुवतीना, अशी कुठलीही भरती केली नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
सोमवारी या युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. सुशिक्षित बेरोजगारांच्या अगतिकतेचा फायदा घेणारे भामटे तयार झाले आहेत. प्रकाश उर्फ जगदीश राठोड रा. घुई, ता. नेर व त्याचा यवतमाळातील एक साथीदाराने याच पद्धतीने युवकांना भुरळ घातली. त्यांच्याकडून प्रत्येकी ३० हजार वसुल केले. नंतर त्यांना नियुक्ती पत्र देत त्यांना कामावरही रुजू होण्याचा आदेश ही दिला. आठ जणांना आर्णी तहसील कार्यालय व न्यायालय परिसरात सिक्युरिटी गार्ड म्हणून रुजू होण्यास सांगितले. नौकरी मिळाली या आनंदात ते आठ युवक युवती तेथे गेले. परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही नियुक्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले. या बाबत जगदीश राठोड याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आर्णी उमरखेड यवतमाळ महागांव तालुक्यातील युवक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. त्यांनी नगरसेवक नितीन मिझापुरे यांना सोबत घेऊन आपली समस्या मांडली. युवकांना फसवणाऱ्यावर प्रत्येक तालुक्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी वैशाली मस्के, राजरत्न हनवते, बालाजी तुमवार, अजय ठाकरे, प्रशांत बारडे, परमेश्वर पाटे, नितीन चौधरी, प्रतिभा बारडे आदी उपस्थित होते.
आर्णी तालुक्यातील २० जणांना गंडविले
"प्रकाशने केवळ एकाच गावातील तर जिल्ह्यातील विविध बेरोजगार युवकांना सिक्युरिटी कंपनीत लावून देण्याचे आमिष दाखवून गंडविले आहे. त्याने आर्णी तालुक्यातील २० लोकांकडून ५.५० लाखांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आर्णी येथील फसवणूक झालेल्या एका युवकाने पोलिसात तक्रार नोंदविली. आर्णी पोलिसांनी प्रकाश राठोड विरुद्ध कलम ४२०,५०६,५०४ नुसार गुन्हे दाखल केले आहे."
नोकरीचे आमिष देणारी टोळी लाखोंच्या घरात
या टोळीने सुपरवायजर पदासाठी काही तालुक्यातून साठ ते सत्तर हजार रुपये घेतले. जिल्ह्यातील २०० ते २५० युवक युवातींना चांगला गंडा घालण्यात आल्याची माहिती मिळाली. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा येथील फसगत युवक तक्रारी देण्याच्या तयारीत असल्याचे माहिती मिळाली आहे. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील युवकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या, त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. तरी जिल्हा अधीक्षक भुजबळ पाटील साहेब हे काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक! तसे नियुक्तीपत्र ही दिले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2021
Rating:
