लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लढवणार देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक!

                      (संग्रहित छायाचित्र)

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नांदेड, (१३ जुलै) : आपल्या दिलखेच अदाकारीने भल्याभल्यांना ठेका धरायला लावणारी महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर- बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. त्यामुळे देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक घेतली जाणार असून ही निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. आता या इच्छुकांच्या यादीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचीही भर पडली आहे.
आज नांदेड दौऱ्यावर आलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देलगूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे या मतदारसंघातून उमेदवारीही मागितली आहे. आता मेटे त्यांना या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी देतात का? आणि त्यांनी उमेदवारी नाही दिली तर सुरेखा पुणेकर अन्य कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या फडात उतरणार का? असे प्रश्न आता चर्चिले जाऊ लागले आहेत.

 लावणीचा फड गाजवणाऱ्या सुरेखा पुणेकर आधीपासूनच राजकारणाच्या फडात येण्यास इच्छूक आहेत. आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आधी फिल्डिंग लावून पाहिली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सुरेखा पुणेकर यांनीच बोलून दाखवले होते. आता देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा फड त्या कसा रंगवणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लढवणार देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक! लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लढवणार देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.