सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१ जुलै) : तालुक्यात रोजगाराच्या वाटा अतिशय कमी असल्याने बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. उद्योग, कंपण्या व कारखाण्यांची तालुक्यात वानवा आहे. त्यामुळे रोजगार मिळणे कठीण झाले आहे. बेरोजगारांच्या फौजा तयार होऊ लागल्या आहेत. युवकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होऊ लागलं आहे. कुटुंबाचा आधार असलेले युवकच बेरोजगार असल्याने कुटुंबाला हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. तालुक्यात मोठे उद्योग व कारखाने निर्माण होईल यावर जोर देण्याची आज नितांत गरज आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून रेंगाळलेले सूतगिरणीचे काम पूर्ण करणे आता जरुरी झाले आहे. सूतगिरणीचे अर्धवट काम पूर्ण झाल्यास येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे सूतगिरणीच्या कामाला गती मिळावी म्हणून इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष व शिवसेना विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनिल कातकडे यांनी प्रयत्न चालवले आहे. सूतगिरणी निर्माणातील आर्थिक व तांत्रिक अडचणी सोडविण्याकरिता त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेतली. सूतगिरणीचे काम पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या निधी बाबतही सुनिल काटकडे यांनी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. सूतगिरणीचा विषय मार्गी काढण्याच्या दृष्टीने समाधानकारक चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. वणी मुकुटबन मार्गावरील शिरगिरी शिवारात १८ नंबर रेल्वे पुलाजवळ इंदिरा सूतगिरणी तत्कालीन आमदारांच्या कार्यकाळात मोठ्या थाटात उभी करण्यात आली. २४ एप्रिल १९९१ ला इंदिरा सूत गिरणीची नोंदणी झाली, व ८ व्या पंचवार्षिक योजनेनुसार राज्य शासनाने सूत गिरणी उभारणीला मंजुरी दिली. परंतु कित्येक वर्षे झाली तरी या सूतगिरणीचे काम पूर्णत्वास आले नाही. ही सूतगिरणी आजही राम भरोसे आहे. या सूतगिरणीचे काम पूर्ण करण्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आता या सूतगिरणीचे अध्यक्ष पद सुनिल कातकडे यांच्याकडे आहे. वणी तालुक्यात कापसाचे भरगोस उत्पन्न होते. ही सूतगिरणी तयार झाल्यास त्याचा कास्तकारांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच तालुक्यातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता ही सूतगिरणी बेरोजगार युवकांकरिता वरदान ठरू शकते. याकरिता सुनिल कातकडे यांनी ही सूतगिरणी पूर्णत्वास आणण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्याकरिता २३२.६६ लाख सभासद भाग भांडवल गोळा करण्यात आले आहे. या गिरणीला आज पर्यंत ११९३.८५ लाख शासकीय भाग भांडवल प्राप्त झाले आहे. आता प्रकल्प सुरु करण्याकरिता २५ कोटी रुपये अपेक्षित आहे. शासकीय भाग भांडवल मिळविण्याकरिता ५ टक्के भाग भांडवल, सभासदाचा सहभाग व ५० टक्के दीर्घ मुदती कर्ज, त्यानंतर ४५ टक्के शासनाचे भाग भांडवल असणे गरजेचे आहे. प्रथम संस्थेला २.३२ लाख सभासद भांडवल गोळा करणे जरुरी आहे, नंतर आणखी तेवढेच भांडवल जमा करण्याचे अध्यक्षांसमोर आव्हान आहे. भाग भांडवल जमा झाल्याशिवाय शासनाकडून उर्वरित निधी मिळणे शक्य नाही. सध्याची परिस्थिती भाग भांडवल मिळविण्याकरिता पूरक नसून गिरणी प्रकल्प पूर्णत्वास येणे शक्य नसल्याने यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्याकडे दीर्घ मुदतीचे कर्ज मिळण्याकरिता सुनिल कातकडे यांनी अर्ज केला आहे. माजी आमदार वामनराव कासावार हे या सूतगिरणीचे डायरेक्टर असल्याने व वस्त्रोउद्योग मंत्री पद काँग्रेसकडेच असल्याने सूतगिरणीच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा सुनिल कातकडे यांची आहे. गिरणी प्रकल्प किमतीच्या ४५ टक्के रक्कम ४०.९३ लाख रुपये शासकीय भाग भांडवल म्हणून प्राप्त होणे अपेक्षित असून त्या पोटी मिळालेले ११९३.८५ लाख रुपये वगळता २८.९९१५ लाख शासनाकडून भाग भांडवल मिळाल्यास सूतगिरणी उत्पादनाखाली येऊ शकते. सूतगिरणी प्रकल्प पूर्णत्वास आणण्याकरिता लागणाऱ्या निधीचा तपशील पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या समोर निवेदनातून सादर करून हा प्रकल्प पूर्ण कारण्याकरिता शासकीय भांडवल उपलब्ध करून देण्याची मागणी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे यांनी केली आहे.
सूतगिरणी प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या हालचालींना वेग, सुनिल कातकडे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 01, 2021
Rating:
