सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२३ जुलै) : शहरातील आंतरिक रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे बुजविण्याची तसदी घेतली जात नसल्याने हे खड्डे आता अपघातास कारणीभूत ठरू लागले आहेत. संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणा नागरिकांच्या जीवावर बितण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ निर्माण झालेला मोठा खड्डा मागील काही महिन्यांपासून दुर्लक्षितच असून रुग्णालयात उपचाराकरिता आलेली महिला या खड्ड्यात पडून गंभीर जख्मी झाली. अतिशय खोल असलेल्या या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारही अनियंत्रित होऊन खाली पडल्याच्या अनेक घटना याठिकाणी घडल्या आहेत.
लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी वर्गाचे नेहमी ग्रामीण रुग्णालयात जाणे येणे असते, पण त्यांच्या दृष्टीस हा धोकादायक ठरू पाहणारा खड्डा पडू नये, याचेच नवल वाटते. शहरातील समस्यांकडे लक्ष वेधणारे सामाजिक व राजकीय पुढारी लोप पावत असल्याची भावना आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
शहरातील आंतरिक व मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आला आहे. संबंधित विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्यांचे आता जीव धोक्यात येऊ लागले आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालयाजवळील खड्डा अद्यापही दुर्लक्षितच असून हा खड्डा न बुजविण्याचा संबंधित विभागाने निर्धारच केल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अगदी गेट जवळ खूप मोठा खड्डा तयार झाला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून हा खड्डा दुर्लक्षित असून खड्डा बुजविण्याकडे संबंधित विभाग व रुग्णालय प्रशासन लक्ष द्यायला तयार नसल्याने हा खड्डा आता रुग्णालयात येणाऱ्यांकरिता धोकादायक ठरू लागला आहे. दोन तीन दिवसांपूर्वी या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रुग्णालयात आलेली महिला या खड्ड्यात पडून जख्मी झाली. नंतर रुग्णालयासमोरील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातील कार्यकर्ते या महिलेच्या मदतीस धावले व तिला घरपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली. रुग्णांच्या मदतीकरिता तत्पर असलेली ही राजकीय मंडळी हा खड्डा बुजविण्याकरिता संबंधित विभाग व रुग्णालय प्रशासनावर दबाव का आणत नाही, ही खंत याठिकाणी येणाऱ्या रुग्णांमधून व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यामध्ये खड्डे पाण्याने भरले जात असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे हे खड्डे नागरिकांच्या अपघातास कारणीभूत ठरतात. रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या स्वागताकरिता हा खड्डा दुर्लक्षित ठेवला असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. येथेच जख्मा व येथेच उपचार ही रुग्णालयाची तत्वप्रणाली झाली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटू लागल्या आहेत. कधी काळी समस्यांचा कांगावा करून पेटून उठणारे राजकीय व सामाजिक पुढारी आता समस्या डोळ्याने दिसत असतांनाही मूग गिळून बसले आहेत. याचीच खंत वाटते. शहराचं विद्रुपीकरण होत चाललं आहे. न्यायाधीशांच्या शासकीय निवास्थानापासून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर नेहमी तळे साचलेले असते. गाळ्यांमधील दुकानांसमोरच घाणपाणी साचून राहते. कुणीही याची दखल घ्यायला तयार नाही.
जगन्नाथबाबा मंदिर ते दत्त मंदिर पर्यंत रस्त्याच्या कडेने वाहणाऱ्या खुल्या गटाराची मळमळल्यागत दुर्गंधी येते. या दुर्गंधीमुळे कित्येकांनी मॉर्निंग वॉक व फेरफटका मारण्याचा मार्गच बदलला आहे. अशा अनेक समस्यांनी शहरवासी त्रस्त आहेत. पण या समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायलाच तयार नसल्याने शहरवासियांचा नाईलाज होत आहे.