सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.८) : नभ दाटून येतात, ढगांचा गडगडाटही होतो, सुसाट्याचा वाराही सुटतो, पण पाऊस मात्र हुलकावणी देत असल्याने वातावरणातील उकिरडा कमी होतांना दिसत नाही. तीव्र स्वरूपाचा पाऊस अद्यापही शहरवासीयांनी अनुभवाला नाही. आनंदसरी बारसण्याची जो तोच आतुरतेने वाट पहात आहे. सुखद गारवा अनुभवायला प्रत्येकचं जीव आतुर झाला आहे. जिवाची लाही करणारी उष्णता केंव्हा एकदाची संपते असे प्रत्येकांनाच वाटू लागले आहे. पण मागील पंधरा दिवसांपासून नभातील काळे ढग वाकुल्या दाखवीत आहे. ढगाळ वातावरण तर आहे, पण जमिनीला ओलावा देणाऱ्या जलधारा मात्र अजूनही बरसल्या नाही. प्रत्येक घरात कुलरची घरघर आद्यपही सुरूच आहे. मान्सूनपूर्व पावसानेही शहराला सुखद अनुभव दिला नाही. हवामान खात्याचे अंदाज वेळोवेळी बदलत आहे. ८ जूनला सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पावसाच्या स्वागताला शहरवासी सज्जही झाले होते. आज ११ वाजता पासून नभात काळे ढग दाटून आले. रिपरिपही सुरु झाली. पण शहरवासी तृप्त होईल असा पाऊस मात्र पडला नाही, त्यामुळे तेही निराश झाले आहे. नंतर ४ वाजता पासून आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. हवेत गारवा आला. पण पावसाने गार केले नाही. थेंबाथेंबातच शहरवासीयांना समाधान मानावं लागलं. "आनंदीले मनाला नभ आले दाटुनी, अलगद बरसतील सरी कवटाळेल मी चिंब होऊनी." आनंद सरींचा वेध घेतांना मनही अधीर होऊ लागले आहे. नभात दाटून आलेले ढग भुरळ घालून दगा का बरं देत आहे, सरींना बरसण्यापासून का रोखत आहे, अशी भावनिक साद शहरवासी घालत आहेत. मृग नक्षत्र सुरु होऊनही जलधारा न कोसळल्याने प्रत्येकाच्याच मनाला घोर लागला आहे. जोरदार सरींचं आगमन व्हावं ही ज्याला त्यालाच ओढ लागली आहे. पाऊस जमिनीला तृप्त करेल व वातावरणात गारवा निर्माण होऊन उकिरड्यापासून मुक्तता मिळेल, ही आस आता शहरातील प्रत्येक जीवाला लागली आहे. कास्तकारांनीही खरिपाच्या पेरण्या करतांना आततायीपणा करू नये. मान्सूनचं दमदार आगमन झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. कारण पावसाच्या लहरीपणाचा मागच्या वर्षीही अनुभव आला आहे. थोडी झलक दाखवून दडी मारण्याचं त्याच दगाबाज रूप ओळखूनच बियाणं पेरावं, जेणेकरून दुबार पेरणीच संकट ओढावणार नाही. संकटाच्या या काळात सावधानी बाळगणं केंव्हाही चांगलं. मान्सूनचे अंदाज चुकत आहे. येणारा पाऊस मान्सूनचा आहे की, मान्सून पूर्वीचा आहे, याची खात्री पटल्या शिवाय बियाण्यांची पेरणी करू नये. समाधानकारक पाऊस पडल्यानंतरच शेतात पेरण्या कराव्या, नंतर पावसाने दडी मारली तरी जमिनीतील ओलाव्याने बीजांना अंकुर फुटतील. पावसाच्या लहरीपणाचा अनुभव घेऊनच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या.
आकाशात ढग येतात दाटून, पण दमदार सरींचा पाऊस आला नाही अजून !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 08, 2021
Rating:
