जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल मंदर येथील घटना

                       (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१२) : तालुक्यातील मंदर गावामध्ये घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांना जातीवाचक शिवीगाळ व अश्लील शब्द प्रयोग करून धमकावल्या प्रकरणी वणी पोलिस स्टेशन येथे तीन आरोपींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदर येथे रहात असलेल्या एका कुटुंबाचं घराचं बांधकाम सुरु असल्याने रस्त्यालगत रेती टाकण्यात आली. रस्त्यावर रेती का टाकली या कारणास्तव शेजारी कुटुंबातील पती पत्नीला अश्लील शब्दात जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याची घटना काल १० जूनला साय. ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 
तालुक्यातील मंदर या गावी छाया भास्कर जिलटे या पती बरोबर मजुरी करून राहतात. त्यांच्या शेजारी जगदीश मारोती मोवाडे यांचं घर आहे. छाया जिलटे याच्या मुलीनं मोवाडे कुटुंबातीलच मुलाशी आंतरजातीय विवाह केल्याने या कुटुंबामध्ये जुनाच वाद आहे. छाया जिलटे यांच्या मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने त्यांची या कुटुंबाशी बोलचाल बंद आहे. छाया जिलटे यांच्या घराचं बांधकाम सुरु असल्याने त्यांनी रस्त्यालगत रेती टाकली. रेती रस्त्यावर का टाकली, या शुल्लक कारणावरून वाद उपस्थित करत जगदीश मारोती मोवाडे याने जिलटे पती पत्नीला अश्लील शब्दात जातीवाचक शिवीगाळ करून घराबाहेर निघण्याची धमकी दिली. मोवाडे कुटुंबाच्या जातीवाचक शिवीगाळ व धमकीमुळे धास्तावलेल्या जिलटे पती पत्नीने वणी पोलिस स्टेशन गाठून मोवाडे कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपी जगदीश मारोती मोवाडे (३५), अनिता जगदीश मोवाडे (२५) व विमल मारोती मोवाडे (५०) यांच्यावर भादंवि च्या कलम २९४,५०६,३४ व सहकलम ३(१), ३(१)(५) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास पोलिस करीत आहे. 

 
जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल मंदर येथील घटना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल मंदर येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.