टॉप बातम्या

सासुरवाडीला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू


                                             (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.४) : मालवाहू पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना वणी वरोरा रोडवरील सावर्ला गावाजवळ काल ३ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडली. निलेश नामदेव मिलमिले (३२) रा. सुमठाना, भद्रावती असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
भद्रावती शहरातील सुमठाना येथे राहणाऱ्या निलेश मिलमिले याची वणी तालुक्यातील कुरई या गावची सासुरवाडी असून त्याची पत्नी मागील काही दिवसांपासून माहेरी आली होती. काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो भद्रावती वरून कुरई येथे जाण्याकरिता दुचाकीने निघाला. निलेश हा सावर्ला गावाजवळून कुरईकडे जात असतांना वणी कडून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटना घडलेल्या ठिकाणाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. (अपघातात कारणीभूत ठरलेली मोटर पिकअप)

पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेले MH 29 BE 0238 हे मालवाहू पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चालकावर गुन्हा दाखल केला आहे. माहेरी असलेल्या पत्नीची ओढ लागल्याने सासुरवाडीला जाण्याकरिता आतुर होऊन निघालेल्या युवकावर काळाने घाला घातला. पत्नीला भेटण्याची आतुरता कायमचा विरह देऊन गेली. सासुरवाडीला पोहोचण्याआधीच मृत्यू आडवा आला. त्याच्या या अकाली जाण्याने दोनही कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. निलेशचा अनाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Previous Post Next Post