कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, आज आढळले केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.०१ जून) : तालुक्यात प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणारे कोरोनाचे रुग्ण आता कमी झाले आहेत. कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असून नागरिकांना संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्या रोडवल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून पॉझिटिव्हिटी दरही कमी झाला आहे. आज तालुक्यात केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२२७ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण कमी होऊन ८९ वर आले आहेत. आता पर्यंत ५०४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ९३ झाला आहे. प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येऊन रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रुग्णवाढ कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले असून बाजारपेठेची वेळ वाढवून दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतेरिक्त इतरही दुकानांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी काही नियम अटी लागू करण्यात आल्या आहे. 
एप्रिल व मे महिना कोरोनाचा हॉसस्पॉट महिना ठरला. या महिन्यांमध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळले. रुग्णसंख्याही तीव्र गतीने वाढली. वाऱ्याच्या वेगाने संक्रमण झाल्याने तालुक्यात हाहाकार माजला. पॉझिटिव्ह रुग्णांचं भरतं आलं. प्रशासन चिंताग्रस्त झाले. नागरिक धास्तीत आले. नियोजन व उपाययोजना निष्फळ ठरू लागल्या. मग प्रशासनानं स्वतः धुरा सांभाळत नियोजनाची पद्धत बदलली. शासनाने पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनावरही नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी टाकली. मग सुरु झाली प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी. तिनही विभागाचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. मग कोरोनाही धास्तावला व त्याने माघार घेण्यास सुरुवात केली. २१ मे पासून कोरोनाला उतरती कळा लागली. संक्रमणाची गती कमी झाली व रुग्णसंख्येचा वेग मंदावला. नंतर काही दिवसांनी बोटावर मोजण्याएवढे रुग्ण आढळू लागले. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. 
१ ते २० मे पर्यंत रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम होता. या २० दिवसांत विक्रमी संख्येने रुग्ण आढळले. रुग्णसंख्येत कमालीची भर पडली. १ ते २० मे या २० दिवसांत तब्बल १९६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर २१ मे पासून रुग्णसंख्या रोडावली. २१ ते ३१ मे या ११ दिवसांत केवळ १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मे महिन्यात ३९ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. ३९ व्यक्तींवर अकाली मृत्यू ओढावला. परंतु आता कोरोनाने नांगी टाकली आहे. आज केवळ ३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये चनाखा येथील दोन व येनक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. १४७ व्यक्तींचे अहवाल प्राप्त होणे अजून बाकी आहेत.
कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, आज आढळले केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, आज आढळले केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.