शाळा बंद असल्याने खर्रा घोटण्याचे काम करणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू

                     (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.४) : कोरोना लॉकडाऊनमुळे मागील दिड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी कुटुंबाला हातभार लावण्याकरिता व स्वतःचा खर्च भागविण्याकरिता मिळेल ती रोजंदारीची कामे करू लागली आहेत. अशाच एका रोजंदारीने कामाला जाणाऱ्या विद्यार्थ्याला विजेचा करंट लागल्याने अनाहक जिव गमवावा लागला. नातेवाईकाकडे रोजीने खर्रा  घोटण्याचे काम करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला विजेचा करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ब्राम्हणी या गावात आज ४ जूनला दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली. समीर विलास काळे (१६) रा. ब्राम्हणी असे या मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. 
याबाबत मृतक तरुणाचे मोठे वडील विजय बापूराव काळे (४५) रा. ब्राह्मणी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून त्यांचा लहान भाऊ कुटुंबासह ब्राम्हणी या गावात राहतो. मोलमजुरी करून तो आपल्या परिवाराचा उदर्निवाह करतो. त्याचा १६ वर्षीय मुलगा शाळा बंद असल्याने गावातीलच उमेश देविदास काळे या आपल्या नातेवाईकाकडे रोजीने खर्रा घोटण्याचे काम करत होता. विजेवर चालणाऱ्या खर्रा घोटण्याच्या मशीनवर खर्रा तयार करत असतांना त्याला मशीनचा करंट लागला. तो जमिनीवर निपचित पडून असतांना त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खर्रा तयार करणाऱ्या मशीनचा करंट लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे मोठ्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी हट्टाहास करीत रोजंदारीच्या कामाला जाऊन स्वतःचा खर्च व कुटुंबाला हातभार लावण्याची जबादारी पार पाडत आहे. संकटाच्या या काळात हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्य कुटुंबाला हातभार लावण्याकरिता रोजंदारीची कामे करतांना दिसत आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थीही कामोकामी लागले असून त्यांचं शैक्षणिक जीवन उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आलं आहे. शाळा बंद असल्याने खर्रा घोटण्याच्या कामावर जाणाऱ्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. विद्यार्थ्याचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 
पुढील तपास पोलिस करीत आहे.
शाळा बंद असल्याने खर्रा घोटण्याचे काम करणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू शाळा बंद असल्याने खर्रा घोटण्याचे काम करणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.