सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
चंद्रपूर : देशातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाच्या वतीने बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी ‘पोलीस स्मृतिदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा स्मारक मैदानावर सकाळी ८.३० वाजता हा गंभीर व भावपूर्ण सोहळा पार पडणार आहे. यावेळी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या अतुलनीय त्यागाचे स्मरण केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह (भा.प्र.से.) आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पोलीस दलातील जवानांनी देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेले बलिदान सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या शौर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या स्मृतिदिनाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून हुतात्मा पोलिसांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे (म.पो.से.) यांनी केले आहे.
