टॉप बातम्या

वनहक्क दाव्यांसाठी चंद्रपुरात शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन पेटले

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनहक्क दावेदार शेतकरी आणि ग्रामस्थांचे शांततामय ठिय्या साखळी उपोषण सुरू झाले आहे. मौजा मुधोली, घोसरी, सोनेगाव, कोकेवाडा, अर्जुनी आणि खुटवंडा येथील शेतकरी व ग्रामस्थ या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. "जंगल आमचे, जमीन आपली, हक्क आमचे" आणि "जंगल वाचवा, शेतकरी वाचवा, पर्यावरण वाचवा" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.  

या आंदोलनादरम्यान एका विशेष शिष्टमंडळाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे एक लेखी निवेदन त्यांना सादर केले. मात्र, जोपर्यंत प्रशासनाकडून आपल्या मागण्यांवर ठोस आणि लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आणि उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम आणि इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलनकर्ते 

आंदोलकांनी प्रशासनासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनहक्क दावे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळवून देऊन त्यांना न्याय द्यावा, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
  
०२ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या हक्काच्या जमिनी आणि वनहक्कासाठी पेटून उठलेले शेतकरी तीव्र उन्हातही आंदोलनावर ठाम आहेत. आता चंद्रपूर जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना कधी लेखी आश्वासन देऊन न्याय मिळवून देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();