टॉप बातम्या

वणीतील ६.७२ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वणी शहरातील कनकवाडी परिसरात झालेल्या तब्बल ६ लाख ७२ हजार रुपयांच्या घरफोडीचा वणी पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेले ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे घरफोडीच्या घटनेचा छडा लागला आहे.

कनकवाडी, वणी येथील बंडू विठोबा बोथले (वय ६२) यांनी १ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, २० ऑगस्ट ते २१ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉकर उघडले. त्यातील एकूण ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे, चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांच्या डी.बी. पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित बालकाला आयफोन १६ प्रो खरेदी करायचा असल्याने त्याने चोरीची बाब आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर अटक आरोपी गुणवंत ऊर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय २३, रा. विठ्ठलवाडी, वणी) तसेच फरार आरोपी सुरज हुसेन गेडाम (वय २५, रा. दहेगाव, ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी त्याला चोरी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात समोर आल्याचे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाने २० ते २१ ऑगस्टच्या रात्री स्वतःच्या आजोबांच्या घरी वाळवीने लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती दिली. 

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता चोरी केलेले सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर किंवा नागपूरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असताना विधीसंघर्षग्रस्त बालक व अटक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ ग्रॅम वजनाचा चपलाकंठी सोन्याचा हार, १५ ग्रॅम वजनाचा मोठा सोन्याचा गोफ, ५ ग्रॅम वजनाचा लहान सोन्याचा गोफ, ३ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स आणि ४ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, असे एकूण ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील फरार आरोपी सुरज गेडाम याचा पोलिसांकडून शोध सुरू असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे व रितेश भोयर यांनी केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();