टॉप बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला यवतमाळ पोलिसांचा प्रतिसाद; डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण वारसा असून, या उत्सवाचे पावित्र्य आणि पारंपरिक स्वरूप जपण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील गणेशभक्तांना डीजेच्या दणदणाटापासून दूर राहत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘डीजे’च्या फंदात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे निर्माण होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास टाळून पारंपरिक वाद्ये, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

उत्सवाचा आनंद द्विगुणित करताना नागरिकांनी सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि पर्यावरणपूरक वातावरण राखण्यास सहकार्य करावे. ‘संस्कृती जपूया, उत्सवाचा आनंद वाढवूया’ या संदेशातून जिल्ह्यातील गणेश मंडळे व गणेशभक्तांनी डीजेमुक्त आणि संस्कृतीप्रधान गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();