सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मच्छिंद्रा येथील भजनप्रेमी तथा कट्टर शिवसैनिक दिलीप धानोरकर यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (१ सप्टेंबर) निधन झाले. वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मच्छिंद्रा परिसरात शोककळा पसरली.
गेल्या काही काळापासून दिलीप धानोरकर हे आजाराशी झुंज देत होते. सोमवारी (३१ ऑगस्ट) रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. मात्र, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप धानोरकर हे भजनाची विशेष आवड असलेले धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. शिवसेनेशी त्यांची निष्ठा असून ते कट्टर शिवसैनिक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी मच्छिंद्रा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि दोन मोठे भाऊ असा आप्त परिवार आहे.