सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : इतर अनेक कौशल्यांसारखेच लेखनकौशल्यही आपल्याला वाढवता येते. लेखनाचा नियमित सराव केल्यास ते साध्य होते. लेखनकौशल्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वाचणे आवश्यक आहे. वाचनाशिवाय लेखनकौशल्य विससित करणे अवघड आहे. असे प्रतिपादन मुक्तलेखक, निवेदक, वक्ता सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केलं.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट द्वारा संचालित मारेगाव तालुक्यातील स्व. लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात आयोजित 'वक्तृत्त्व आणि लेखनकौशल्य' कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नहाते यांनी भूषवले. यावेळी ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्टचे विश्वस्त प्रा. कुंतलेश्वर तुरविले, शिक्षक देवेंद्र पोल्हे, वीणा निब्रड, अमित मोघे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने कार्यशाळेत मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमात असलेली लेखनकौशल्ये आणि त्यातील बारकावे सांगितले. बातमीलेखन, प्रमाणलेखन ह्यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. विरामचिन्हे, प्रत्यय, जोडाक्षरे, वाक्यरचना अशा तांत्रिक बाजू त्यांनी सोप्या पद्धतीने शिकवल्यात.
विद्यार्थ्यांना लिखाणात नेहमी येणाऱ्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले. लेखनाच्या प्रात्यक्षिकांसह त्यातील विविध बारकावे स्पष्ट केलेत.
आपल्या प्रास्ताविक भाषणातून मुख्याध्यापक सुरेश नहाते ह्यांनी विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य कार्यशाळेचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्टचे विश्वस्त प्रा. कुंतलेश्वर तुरविले यांनी प्रशिक्षकांचा परिचय करून दिला. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिकाही मांडली. शाळेद्वारा आयोजित विविध शालेय व शालाबाह्य उपक्रमांची माहिती दिली.
अभ्यासक्रमातील बातमीलेखन, निबंधलेखन, पत्रलेखन, जाहिरातलेखन, सारांशलेखन आदी संबंधित विषयांवर ठाकरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. किशोर मोघे ह्यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून ही कार्यशाळा झाली.
आयोजनाची बाजू दिनेश कुमरे, प्रवीण वनकर, चंद्रशेखर राठोड, छत्रपती उईके, शंकर राठोड, प्रमोद बनकर, सुनील आसेकर, संदीप भगत यांनी सांभाळली.



